राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबरला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या खळबळजनक हत्येप्रकरणी आत्तापर्यंत 14 जणांना अटक केली असून त्यापैकी एक आरोपी राम कनौजिया याच्या घरात पोलिसांनी रेड टाकली होती. तेथून एक पिस्तुल आणि ३ जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम कनौजिया हा गेल्या वर्षभरापासून नवी मुंबईतील पळस्पे परिसरात रहात होता.
गेल्या आठवड्यात मुंबई पोलिसांनी राम कनौजिया याच्यासह आणखी आरोपींना अटक केली होती. या हत्याकांडातील हल्लेखोरांना शस्त्रे आणि इतर मदत पुरवणाऱ्या गटात तो सहभागी होता.
दरम्यान बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील एका आरोपीला लुधियाना येथून अटक करण्यात आली आहे. काल लुधियाना पोलीस आणि मुंबई पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत सुजित कुमार नावाच्या आरोपीला लुधियानाच्या भामिया कला परिसरातून ताब्यात घेत त्याला बेड्या ठोकल्या. बाबा सिद्दिकी यांची रेकी करणारा आरोपी नितीन याच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवल्याचा आरोप सुजीत कुमार याच्यावर आहे.
12 ऑक्टोबरला हत्या
फेब्रुवारी महिन्यात काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केलेले बाबा सिद्दीकी हे फक्त राजकारणातच नव्हे तर बॉलिवूडमध्येही खूप प्रसिद्ध होते. अनेक सेलिब्रिटींशी त्यांचे जवळचे संबध होते. 12 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या दिवशी वांद्रे येथे आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेरच बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हायप्रोफाईल हत्येप्रकरणी आतापर्यंत दोन शूटर्ससह 14 जणांना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक करण्यात आली आहे. चौकशीत आरोपींकडे आणखी हत्यारे असल्याचे समोर आले. यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने कनोजियाच्या भाड्याच्या घरात छापा टाकून एक पिस्तूल आणि तीन काडतुसे जप्त केली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
फोनमध्ये सापडले फोटो
गुन्हे शाखेने गुरनैल सिंग आणि धरमराज कश्यप यांच्यासह आरोपींच्या मोबाईल फोनमधून डेटा काढला, ज्यामध्ये त्यांना शस्त्रांचे फोटो सापडले, असेही पोलीसांनी नमूद केले. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची चौकशी करून त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पुण्यासह विविध ठिकाणी छापे टाकले. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासाचा एक भाग म्हणून पोलिसांनी गुरुवारी बाबा सिद्दीकी यांचा आमदार मुलगा जीशान सिद्दीकी याचा जबाब नोंदवला. या हत्याकांडामुळे प्रचंड खळबळ माजली आहे. लरेन्स बिश्नोई गँगने या हत्याकांडाची जबाबदारी स्वीकारली आहे.