12 ऑक्टोबर संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशभरात दसऱ्याचा उत्साह असताना मुंबईतील वांद्रे येथे प्रख्यात राजकारणी बाबा सिद्दीकी यांच्यावर तिघांनी गोळीबार करत त्यांचा जीव घेतला. या हायप्रोफाईल हत्येमुळे मोठी खळबळ माजली असून 2 शूटर्ससह आत्तापर्यंत एकूण 14 जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबई क्राईम ब्रांचचे अधिकारी याप्रकरणी सर्व बाजूंनी तपास करत आहेत. या शूट आऊट केसमध्ये आता पाकिस्तान कनेक्शन समोर आलं आहे. क्राईम ब्रांचच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानमधून ड्रोनच्या सहाय्याने भारतात ही शस्त्र पाठवण्यात आली होती. त्यामध्ये तीन विदेशी तर एका देशी पिस्तुलाचा समावेश आहे.
बाबा सिद्दीकी गोळीबार प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेने आणखी एक खुलासा केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईत तस्करी करण्यात आलेली तीन विदेशी पिस्तुलं भारताच्या सीमेवर ड्रोनद्वारे पोहोचवली गेली होती आणि नंतर हँडलर्सद्वारे मुंबईत पाठवली गेली.
भारतात कशी आली शस्त्रं ?
हँडलर्समार्फत शस्त्रे मुंबईत पाठवल्यानंतर बाबा सिद्दीकी यांच्यावर 3 विदेशी पिस्तुल आणि एका देशी पिस्तुलाने हल्ला करण्यात आला. मात्र, विदेशी पिस्तुलांवर भारतात बंदी असताना ती भारतात आलीच कशी? असा प्रश्न आता बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर उपस्थित होत आहे .
ड्रोनद्वारे ही शस्त्र पाकिस्तानातून राजस्थान किंवा पंजाब बॉर्डरवर मागवण्यात आली असावीत असा क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांना संशय आहे. बिश्नोई गँगपर्यंत ही शस्त्र पोहोचवण्यात पाकिस्तानी गँग किंवा ISI चाही हात असू शकतो. मात्र याचा खुलासा होण्यासाठी झिशान आणि शुभम लोणकर यांना अटक होण तितकंच महत्वाचं आहे. पण सध्या ते दोघेही फरार असून पोलिसांकडून त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे. मुंबई पोलिसांनी राजस्थान तसेच पंजाब पोलिसांनाही या पिस्तुलांचे फोटो पाठवले आहेत, जेणेकरून अशा कारवायांमध्ये कोणी हिस्ट्री शीटर्स असतील तर त्यांची ओळख पटवता येईल. अशी माहितीही समोर आली आहे.
ड्रोनद्वारे शस्त्र पोहोचली भारतात
अशी शस्त्र ड्रोनद्वारे पोहोचलवली जाऊ शकतात, असा दावा करण्यात येत आहे. त्याशिवाय परदेशी बनावटीचती पिस्तुलं देशात येण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नाहीये. पोलीस सध्या अशा प्रकरणांशी संबंधित लोकांची आणि बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी करत आहेत. सीमेपलीकडे शस्त्रे कोणी पाठवली,कोणाच्या सांगण्यावरून पाठवली आणि या हत्येमागचा हेतू काय होता ? या प्रश्नांची उकल करणं हा पोलिसांसमोरचा महत्वाचा मुद्दा आहे. सध्या शुभम लोणकर, जीशान अख्तर यांच्यासह शस्त्र तस्करांचा शोध सुरू आहे. दरम्यान, लुधियाना येथून आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आतापर्यंत एकूण 15 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील विख्यात राजकारणी बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबरला हत्या झाली. शनिवारी रात्री उशिरा बाबा सिद्दीकी त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकी याच्या कार्यालयातून बाहेर पडून घराकडे जात असतानाच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. बाबा सिद्दीकी यांना 3 गोळ्या लागल्या, या हल्ल्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथेच त्यांचा मृत्यू झाला.