Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेवर गोळी चालवणारा ऑफीसर कोण ? प्रदीप शर्मांसोबत केलंय काम

| Updated on: Sep 24, 2024 | 8:24 AM

बदलापूरमधील शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. इनस्पेक्टर शिंदेंनी त्याच्यावर गोळी झाडली. संजय शिंदे यांनी यापूर्वी ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी कक्षात काम केले आहे.

Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेवर गोळी चालवणारा ऑफीसर कोण ? प्रदीप शर्मांसोबत केलंय काम
Follow us on

संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या बदलापूरमधील शाळेतील लैंगिक अत्याचाराच्या घटनेतीला आरोपी अक्षय शिंदे याचा काल ( सोमवार) संध्याकाळी मृत्यू झाला. पोलिसांच्या एनकाऊंटरमध्ये अक्षयचा जीव गेला. या अतिशय खळबळजनक घटनेमुळे संपूर्ण राज्यात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून नव्या वादालाही तोंड फुटलंय. आरोपी अक्षय शिंदेने पोलिसाच्या रिवॉल्व्हरचा वापर करून गोळीबार केला त्याला प्रत्युत्तर देताना पोलिसांनीही फायरिग केले, त्यामध्ये अक्षय शिंदे ठार झाला. अक्षय शिंदेवर गोळी चालवणारा तो ऑफीसर कोण ? असा प्रश्न सध्या अनेकांच्या मनात आहे.

आरोपी अक्षयने पोलीस व्हनमध्ये असतानाचा पिस्तुल हिसकावून गोळीबार केला, त्यामध्ये इन्स्पेक्टर संजय शिंदे आणि सहाय्यक पोलीस इन्स्पेक्टर निलेश मोरे जखमी झाले. गोळीबाराला प्रत्युत्तर देण्यासाठी आणि आरोपीला रोखण्यासाठी इन्स्पेक्टर संजय शिंदे यांनी जीव धोक्यात घालत गोळी चालवली, त्यामध्ये जखमी झालेल्या अक्षय शिंदेचा मृत्यू झाला.

कोण आहेत संजय शिंदे ?

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेवर गोली चालवणारे इन्स्पेक्टर संजय शिंदे यांची कारकीर्द बरीच चर्चेत होती.संजय शिंदे हे बदलापूर बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी गठीत केलेल्या विशेष तपास पथकाचे (SIT) अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी कक्षात काम केले आहे. एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबतही त्यांनी काम केलंय. 1983 मध्ये पोलीस दलात दाखल झालेले प्रसिद्ध एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी आपल्या कारकिर्दीत 100 हून अधिक गुन्हेगारांचा सामना केला आहे. गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला अटक करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये संजय शिंदे यांचाही समावेश होता.

संजय शिंदे यांच्या कारकिर्दीतील वाद

संजय शिंदे यांच्या कारकिर्दीत अनेक वाद झाले. खुनाचा आरोप असलेला विजय पालांडे हा पोलीस चौकशीदरम्यान पोलीस कोठडूतन पळून गेला होता, त्याला मदत करण्याचा आरोपही संजय शिंदेंवर लावण्यात आला होता. पालांडेच्या गाडीत शिंदे यांचा गणवेशही सापडला होता. त्यानंतर 2014 मध्ये मुंबई पोलिसांनी संजय शिंदे यांना पुन्हा कामावर घेतले.

नेमकं काय घडलं ?

ठाणे क्राईम ब्राँच युनिट 1 मध्ये अक्षय शिंदेवर गुन्हा दाखल होता. बदलापूर बलात्कार प्रकरणात एसआयटीकडून चौकशी सुरू होती. त्याला कोठडीही देण्यात आली होती. त्यामुळे त्याला तळोजा तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. मात्र, आणखी एका गुन्ह्यात त्याला ताब्यात घेण्यासाठी बदलापूर पोलीस आज तळोजा येथे आले होते. सकाळी 5.30 वाजता पोलीस तळोजा कारागृहात पोहोचले होते. अक्षयचा ताबा घेऊन त्याला बदलापूरकडे नेत असताना ठाण्याच्या हद्दीत अक्षयने पोलिसांच्या हातून बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर सेल्फ डिफेन्ससाठी गोळीबार केला. त्यात त्याचा मृत्यू झाला