बदलापूरमध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, तेथे एका अट्टल चेन स्नॅचरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या चौकशीदरम्यान शहरातील 5 गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. आणि एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. तो चोरटा चक्क युट्यूबवरील व्हिडीओ पाहून चेन स्नॅचिंग करण्यास शिकल्याचीही माहिती उघड झाली आहे. प्रवीण प्रभाकर पाटील असे आरोपीचे नाव असून पोलिसांनीच ही माहिती दिली आहे. मात्र त्याच्या या खुलाशामुळे पोलिसही हैराण झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर पूर्व आणि पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसात चेन स्नॅचिंगचे सलग 5 गुन्हे घडले होते. त्यामुळे पोलिसांकडून आरोपीचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू होते. अशातच बदलापूर शहरात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एका इसमाबद्दल पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग करून ताब्यात घेतलं. त्या चोरट्याची चौकशी केली असता त्याने आपणच चेन स्नॅचिंगचे 5 गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिली.
झटपट पैसे कमावण्यासाठी युट्यूबवरून शिकला चोरी
प्रवीण प्रभाकर पाटील असं आरोपी चोराचं नाव असून तो कर्जत जवळच्या शेलू इथं राहणारा आहे. प्रवीण याच्यावर आधी कर्जत तालुक्यात हत्येच्या प्रयत्नाचा एक गुन्हा दाखल आहे. त्यानंतर झटपट पैसे कमावण्याच्या उद्देशाने त्याने युट्युबवर काही व्हिडीओ पाहिले. चेन स्नॅचिंग कसे करावे? याचा व्हिडिओ त्याने तेथे पाहिला, चोरी शिकला आणि त्याचे प्रात्यक्षिक करण्यासाठीच तो बदलापूर शहरात एकटाच येऊन तो चेन स्नॅचिंग करू लागला.
अखेर बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर आणि गुन्हे पोलीस निरीक्षक राजेश गजल यांच्या मार्गदर्शनाखालील टीमने प्रवीण पाटील याला बेड्या ठोकल्या तसेच त्याच्याकडून पाच गुन्ह्यांची उकल केली. पोलीस उपनिरीक्षक गोविंद चव्हाण, प्रशांत थिटे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजाराम कुकले, हवालदार विजय गिरीगोसावी, जगदीश म्हसकर, सुधाकर वरखंडे, कृष्णा पाटोळे, कुणाल शिर्के, पोलीस नाईक विनोद नेमाणे, शिपाई महादेव पिसे यांचा या टीममध्ये समावेश होता. पोलिसांनी या गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेलं साडेचार तोळे सोनं देखील हस्तगत केलं अशी माहिती उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. चोरीसाठी त्या चोरट्याचने केलेल्या या नव्या आयडियामुळे पोलीस देखील चक्रावून गेले आहेत.