ग्रेटर नोएडा : मुलीच्या लग्नासाठी लंडनहून ग्रेटर नोएडात आलेल्या एनआरआय टॅक्सीत तब्बल 1 कोटी रुपयांचे दागिने विसरला. मात्र ग्रेटर नोएडा पोलिसांनी अवघ्या 4 तासात सदर टॅक्सीचा शोध घेत निखिलेश कुमार सिन्हा यांचे 1 कोटींचे दागिने मिळवून दिले. निखिलेश कुमार यांनी पोलिसांचे आभार मानले. निखिलेश कुमार मुलीच्या लग्नासाठी बुधवारी लंडनहून ग्रेटर नोएडात आले.
ग्रेटर नोएडातील समृद्धी ग्रँड अव्हेन्यू आम्रपाली ग्रीन व्हॅली येथे मुलीच्या लग्नासाठी निखिलेश कुमार लंडनहून आले आहेत. विमानतळावरुन उबेर कॅब बुक करुन ते गौर सरोवर पोर्टिको हॉटेल गौर सिटी वन येथे आले.
हॉटेलमध्ये पोहचल्यानंतर सर्व सामान टॅक्सीतून उतरवले, मात्र एक कोटींचे लग्नाचे दागिने असलेली बॅग गाडीच्या डिक्कीतून काढायला विसरले. सिन्हा कुटुंबीयांना सोडून टॅक्सी चालक निघून गेला.
काही वेळाने सामान तपासले असता दागिन्यांची बॅग टॅक्सीमध्ये राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी ग्रेटर नोएडा पोलीस ठाणे गाठत पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर ग्रेटर नोएडा पोलिसांनी अॅक्शन मोडमध्ये येत तात्काळ तपास सुरु केला.
पोलिसांनी उबेरच्या गुडगाव कार्यालयात धाव घेत सदर टॅक्सीच्या लोकेशनची माहिती घेतली. त्यानुसार गाझियाबाद येथील लाल कुआ परिसरात सदर कॅब चालकाला गाठले. पोलिसांनी गाडीची डिक्की उघडून पाहिले असता डिक्कीत दागिन्यांची बॅग आढळली.
पोलिसांनी कॅब चालकासह पोलीस ठाणे गाठले. कॅब चालकाने पोलिसांना सांगितले की, डिक्कीमध्ये दागिन्यांची बॅग राहिली आहे हे आपल्याला माहित नव्हते, कारण आपण डिक्की उघडून पाहिलेच नव्हते.
निखिलेश कुमार यांनीही पोलिसांना सांगितले, बॅग त्यांच्या चुकीमुळे गाडीत राहिली होती, यात चालकाची चूक नव्हती. यानंतर पोलिसांनी सदर दागिन्यांची बॅग सिन्हा कुटुंबीयांकडे सुपूर्द केली.