जळगाव : बाहुबली चित्रपतील एक सीन सध्या जळगावमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. अभिनेता प्रभासच्या सीनची कॉपी एका माथेफिरुने केल्याचं समोर आले आहे. अभिनेता प्रभास याने महादेवाची पिंड एका जागेवरून खोदून काढतो आणि दुसरीकडे धबधबाच्या पाण्याखाली ठेऊन देतो, अगदी या सीनला साजेसाच प्रकार जळगावमध्ये घडल्याने जोरदार चर्चा होऊ लागली आहे. जळगावमध्ये यावल तालुक्यातील साकळी गावात ही खळबळजनक घटना घडली आहे. गावाच्या जवळच पाटचारी आहे. त्याच्या बाजूलाच श्री पाटेश्वर महादेव मंदिर आहे. त्या मंदिरात शेकडो वर्षांची पिंड होती. दर्शनाला गेलेल्या नागरिकांच्या पिंड नसल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे संपूर्ण गावात चर्चा सुरू झाली. ठिकठिकाणी पाहणी सुरू झाली. बाजूलाच असलेल्या पाटचारीमध्येही शोध सुरू झाला आणि पिंड आढळून आली. त्याचा काही भाग तुटलेला अवस्थेत होता. त्यामुळे अज्ञात माथेफिरुने मूळ जागेवरील पिंड खोदून बाजूलाच असलेल्या पाटचारीच्या पाण्यात टाकून दिल्याची घटना समोर आली.
जळगावमधील ही घटना संपूर्ण पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरत असला तरी दुसरीकडे गावकऱ्यांनी दुर्दैवी घटणेमुळे नाराजी व्यक्त केली आहे.
बाहुबली चित्रपटातील साजेसाच प्रकार घडल्याने या घटनेची जोरदार चर्चा होत आहे. तर दुसरीकडे गावकऱ्यांच्या फिर्यादीवरुन आज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या इतर पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
मंदिर आणि परिसरात घडलेला हा दुर्दैवी प्रकार गावकऱ्यांच्या भावनेला वेदना देणारा आहे, गाववकरी त्याचा निषेध व्यक्त करत असून कठोर कारवाईची मागणी करत आहे.