बंगळुरू | 7 ऑक्टोबर 2023 : फॅक्टरीमध्ये काम करणारा तो युवक… त्याच्यासाठी तो फक्त एक कर्मचारीच नव्हता, सख्ख्या मुलासमान होता तो. एवढं प्रेम करायचा की त्याच्यासाठी तो काहीही करायला तयार होता, अगदी काहीही… पण हीच गोष्ट त्याने हेरली आणि त्याचाच गैरफायदा घेत त्याने असं कृत्य केलं, ज्याने त्याचा माणूसपणावरचा विश्वासच उडून गेला.
कर्नाटकच्या बंगळुरूमधील ही घटना वाचाल तर कदाचित तुमच्याही हृदयात कालवाकालव होईल. तेथे एका इसमाने स्वत:च्याच अपहरणाचा बनाव रचला आणि ज्या फॅक्टरीत काम करत होता, त्याच्याच मालकाकडे खंडणीची मागणी केली. खरंतर त्या फॅक्टरीचा मालक त्या युवकाला मुलासारखं समजायचा. त्यामुळेच आपल्याला सोडवण्यासाठी तो खंडणीचे पैसे देईलच याचा त्याला विश्वास होता. पण त्याची ही चलाखी कामी आली नाही आणि तो पकडला गेला. सध्या पोलिसांनी तो युवक आणि त्याच्या दोन मित्रांना अटक केली आहे.
रिपोर्ट्सनुसार, कथितरित्या स्वत:च्या अपहरणाचे नाटक करणारा आणि आपल्याच मालकाकडून दोन लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या एका कर्मचाऱ्याला त्याचा मित्रांसह बेड्या ठोकण्यात आल्या. पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली. आरोपी नुरूल्लाह खान आणि त्याचे साथीदार मंड्या शहरात असल्याची माहिती मिळाल्यावर त्यांना अटक करण्यात आली.
खान याला सहज, झटपट पैसे कमवायचे होते, म्हणूनच त्याने स्वत:च्या अपहरणाचे नाटक रचत मालकाकडे दोन लाख रुपयांची मागणी केली. हा बनाव खरा वाटावा यासाठी त्याने दोन मित्रांचीही मदत घेतली.
गेल्या ५-६ वर्षांपासून खान हा एका फॅक्टरीत काम करायचा. त्या फॅक्टरीचा मालक त्याला मुलासारखंच मानायाचा, पण पैशांसाठी खानने त्याचाच विश्वासघात केला. त्याच्या योजनेनुसार, खानने फॅक्टरीच्या मालकाला फोन केला आणि अज्ञात लोकांच्या टोळीने कॅबमध्ये कोंबून आपलं अपहरण केलं, असं खोटंच सांगितलं. आणि ते खंडणीपायी दोन लाख रुपये मागत आहेत, असेही तो म्हणाल्याचे पोलिसांनी नमूद केलं.
खंडणी देण्यासाठी ते तयार झाले पण
सुरक्षेच्या कारणास्तव २७ सप्टेंबर रोजी फॅक्टरी मालकाने आर.टी.नगर पोलिसांशी संपर्क साधून, अपहरणाबद्दल आणि खंडणीच्या फोनबद्दल सांगितलं. आपण खंडणीचे पैसे देण्यासाठी तयार आहोत, फक्त खानची सुरक्षित सुटका व्हावी, अशी इच्छा असल्याचे फॅक्टरी मालकाने नमूद केले. थोड्याच वेळाने खानने फॅक्टरी मालकाला पुन्हा फोन केला आणि त्याच्या खात्यात खंडणीची रक्कम जमा करण्यासा सांगितले. मात्र यामुळे पोलिसांनी त्याच्या अपहरणाबद्दल शंका आली.
त्यांनी खानच्या फोनचे लोकेशनवर शोधले आणि तो मंड्या येथे असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी तेथे जाऊन शोध घेत खान व त्याच्या मित्रांना अटक केली. आपल्याला झटपट पैसा कमवायचा असल्याने हा अपहरणाचा खोटा कट रचल्याचे त्याने चौकशीदरम्यान कबूल केले. खंडणीची रक्कम मिळाल्यानंतर तो मित्रांसोबत बिहारला पळून जायची योजनाही आखत होता.