फक्त एक फोन आला आणि 5 लाख उडाले,’त्या’ गृहिणीसोबत असं काय घडलं ?; तुम्हीही सावध व्हा

| Updated on: Sep 11, 2023 | 12:15 PM

आधार कार्ड आणि ई-मेल आयडीचा गैरवापर केल्याने एका महिलेला तिची आयुष्यभराची कमाई गमवावी लागली आहे. अवघ्या एका फोनमुळे तिला लाखो रुपयांचा फटका बसला.

फक्त एक फोन आला आणि 5 लाख उडाले,त्या गृहिणीसोबत असं काय घडलं ?; तुम्हीही सावध व्हा
Follow us on

बंगळुरू | 11 सप्टेंबर 2023 : देशातील गुन्ह्यांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. निष्पाप नागरिकांना लुटण्यासाठी गुन्हेगार नवनव्या क्लृप्त्यांचा वापर करतात आणि लोकं त्याला बळी पडतात. अशीच एक घटना बंगळुरूमध्येही (banglore crime) घडली असून मुंबई पोलिसांचे बनावट प्रमाणपत्र दाखवून एका महिलेला लाखो रुपयांचा गंडा घालण्यात (cyber fraud) आला आहे. एका इसमाने मुंबई पोलिस बनावट आयडीचा वापर करून अनेकांची फसवणूक केली आहे. त्यातील फोटो हा क्राईम ब्रांचच्या ऑफीसरचा असून तो खरा असला तरीही त्यातील इतर सर्व तपशील मात्र खोटे आहेत. सायबर फ्रॉड करणाऱ्या इसमाने “मुंबई क्राइम ब्रांच”चा अधिकारी बनत एका महिलेची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. दक्षिण बेंगळुरूमध्ये एका महिलेने दाखल केलेल्या पोलिस तक्रारीनुसार, त्या इसमाने तिच्यावर मनी लाँड्रिंगता आरोप करत तिची ५ लाख रुपयांची फसवणूक केली.

तिच्यासोबत नक्की काय झालं ?

जिगानीजवळील राजापुरा येथे राहणारी 35 वर्षीय महिला ही सायबर फ्रॉडची बळी ठरली. आधार कार्ड आणि ई-मेलचा गैरवापरकरून तिला ठगवण्यात आले. 7 सप्टेंबर रोजी सकाळी 9च्या सुमारास आलेल्या एका कॉलने हे दुष्टचक्र सुरू झाले. कॅन्सल झालेली कन्साईनमेंट (माल) परत मिळवण्यासाठी तिला 1 नंबर दाबण्यास सांगण्यात आले. तिने पाठवलेले इ-कॉमर्स पॅकेट हरवले असेल , असे तिला वाटले होते. त्यामुळे तिने १ नंबर दाबला आणि तेवढ्यात तिला अजय नावाच्या इसमाचा कॉल आला.
अस्खलित इंग्रजी बोलणाऱ्या अजने त्याची FedEx चा प्रतिनिधी म्हणून ओळख करून दिली. तिचे तैवानला जाणारे एक पार्सल “मुंबई कस्टम्स”ने जप्त केल्याचे त्याने तिला सांगितले. त्यामध्ये अमली पदार्थ, आणि इतर अवैध गोष्टी असल्याच्या कारणाने ही कारवाई केल्याचे त्याने नमूद केले.

यामुळे ती महिला गोंधळली आणि आपण असे कोणतेही पॅकेज पाठवले नसल्याचे तिने स्पष्ट केले. परंतु त्यावर तिचे नाव, ईमेल, फोन नंबर आणि आधार कार्ड क्रमांक असल्याने ते तिचेच पॅकेट असल्याचे अजय नामक इसमाने सांगितले. तिने त्यानंतरही नकार दिल्याने, तुमच्या वैयक्तिक कागदपत्रांचा गैरवापर झाल्याचे कारण त्याने पुढे केले. आणि मुंबईला येऊन एक स्टेटमेंट देऊन तुमचे नाव क्लिअर करण्यास त्याने तिला सांगितले,

आपण मुंबईस येऊ शकत नसल्याचे तिने सांगितल्यावर त्याने तिला ‘मुंबई क्राईम ब्रांच’ला स्काईपवरून व्हिडीओ कॉलद्वारे स्टेटमेंट द्यावे असे सांगितले. त्यानंतर नरेश मानक दुसऱ्या कॉलरने हिंदीत बोलायला सुरूवात केली आणि त्याचे ओळखपत्रही पाठवले. तक्रारदार महिलेची कागदपत्रे हवाला पैसे पाठवण्यासाठी वापरण्यात आल्याचे त्याने तिला सांगितले. संशयित अतिरेक्याच्या बँक अकाऊंटशी ते जोडले गेल्याचेही तो म्हणाला. त्यामुळे तिने ‘मुंबई क्राईम ब्रांच’च्या खात्यात सर्व पैसे जमा केले नाही तर तिचे बँक अकाऊंट गोठवण्यात येईल असे त्याने स्पष्ट केले. हे पैसे लवकरच परत मिळतील, असे आश्वासनही त्याने पीडित महिलेला दिले होते. मात्र स्काईपवर हा संपूर्ण कॉल सुरू असताना, आरोपीन एकदाही त्याचा कॅमेरा ऑन केला नाही.

त्यानंतर घाबरलेल्या पीडित महिलेने ५ लाख रुपयांची रक्कम ICICI बँकेच्या 756605000785 नंबरवर ट्रान्स्फर केली. ते अकाऊंट ‘मुंबई क्राईम ब्रांच’च्या कांतीपुडी वीरा राघव यांच्यानेव दिसत होते, मात्र नंतर ते आंध्र प्रदेश येथे असल्याचे स्पष्ट झाले. पैसे मिळाल्यानंतर फसवणूक करणाऱ्यांचा फोन नंबर बंद झाला आणि त्या महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. अवघ्या काही वेळातच तिचे लाखो रुपये गायब झाले. तिने जिगानी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. ‘ मी चांगली अडकले. तो (फसवणूक करणारा) भामटा सतत कॉलवर होता, पण नंतर त्याचा नंबरच लागेना. अवघ्या दीड तासांत मी आयुष्यभराची कमाई गमावली ‘ अशा शब्दांत तिने दु:ख व्यक्त केले. तिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिने तिच्या आधार कार्डची कॉपी आणि ई-मेल आयडी प्रोव्हाईड केला होता. फसवणुकीचे असे बरेच फोन अनेक रहिवाशांना आल्याची माहिती समोर आली आहे.

जिगानी पोलिसांनी IPC कलम 420 (फसवणूक) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी शुक्रवारी संबंधित बँकेला पत्र पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले, मात्र अधिक तपशील देण्यास नकार दिला. पुढील तपास सुरू आहे, असे त्यांनी नमूद केले.