वेब सिरीज पाहून फिल्मी स्टाईलने बँकेची तिजोरी लुटली, ‘या’ मोठ्या बँकेत घडला धक्कादायक प्रकार

| Updated on: Oct 07, 2022 | 8:11 PM

आरोपी अल्ताफ शेख हा कॅश कस्टोडियन मॅनेजर म्हणून कार्यरत होता. त्याने झटपट श्रीमंत होण्यासाठी बँकेतील तिजोरीवर डल्ला मारण्याचा कट वर्षभरापूर्वीच रचला होता.

वेब सिरीज पाहून फिल्मी स्टाईलने बँकेची तिजोरी लुटली, या मोठ्या बँकेत घडला धक्कादायक प्रकार
वेब सिरीज पाहून फिल्मी स्टाईलने बँकेची तिजोरी लुटली
Image Credit source: Google
Follow us on

सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली : युट्यूबवर दरोड्याच्या वेब सिरीज (Robbery web series on YouTube) पाहून फिल्मी स्टाईलने बँकेच्या तिजोरीतून 12 कोटी लंपास करणाऱ्या मॅनेजरला बेड्या ठोकण्यास (Manager Arrest) अखेर पोलिसांना यश आले आहे. अल्ताफ शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपी मॅनेजरचे नाव आहे. डोंबिवलीतील आयसीआयसीआय बँकेत (ICICI Bank) ही धक्कादायक घटना घडली. या गुन्ह्यात मदत करणाऱ्या अल्ताफच्या तीन मित्रांसह त्याच्या बहिणीलाही पोलिसांनी अटक केली आहे.

वर्षाभरापूर्वी रचला होता लुटीचा कट

डोंबिवलीतील एमआयडीसी भागात आयसीआयसीआय बँक आहे. या बँकेत आरोपी अल्ताफ शेख हा कॅश कस्टोडियन मॅनेजर म्हणून कार्यरत होता. त्याने झटपट श्रीमंत होण्यासाठी बँकेतील तिजोरीवर डल्ला मारण्याचा कट वर्षभरापूर्वीच रचला होता.

वेब सिरीज पाहून कट रचला

याकरीता तो वर्षभर बँकेत दरोड्याच्या वेब सिरीज पाहत होता. काही वेब सिरीज पाहून त्याला बँकेच्या तिजोरीतून रोकड कशी लंपास करायची याची कल्पना आली. त्यातच तो कॅश कस्टोडियन मॅनेजर असल्याने त्याला बँकेच्या विषयी सर्वच माहिती होती.

हे सुद्धा वाचा

एक दिवस त्याने बँकेतील तिजोरी रूमच्या बाजूला असलेल्या एसी दुरुस्तीचे काम करताना पहिले आणि त्याने एक योजना बनवली. त्याने आधी सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींचा अभ्यास केला. नंतर चोरीसाठी लागणारे साहित्य गोळा केले.

प्लाननुसार 34 कोटी बाहेर फेकले

प्लाननुसार 9 जुलै रोजी सुट्टीच्या दिवशी बँकेचे अलार्म निष्क्रिय करत सर्व कॅमेऱ्यांच्या हार्ड डिस्क काढून तिजोरीतून 34 कोटी रुपये त्याने एसीच्या डक्टमधील छिद्रातून बँकेच्या इमारतीच्या मागील बाजूस बांधलेल्या ताडपत्रीत फेकून दिले.

मित्रांना बोलावून 12 कोटी लंपास केले

यानंतर बँकेतील सीसीटीव्हीचा डीव्हीआर गहाळ असल्याची माहिती बँकेच्या वरिष्ठांना देऊन तिजोरीतील रक्कम तपासणी करण्याचे पथक बँकेत बोलावले. एकीकडे तपासणी सुरू असताना दुसरीकडे आपल्या तीन मित्रांना बोलावून 34 कोटीपैकी 12 कोटी लंपास केले.

कुरेशी, अहमद खान आणि अनुज गिरी अशी अन्य तिघा आरोपींची नावे आहेत. त्यानंतर चोरीचा बनाव करत त्याने मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी तपास करत विविध बाबी तपासून यामधील तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या.

आरोपींकडून एकूण 9 कोटी हस्तगत

आरोपींकडून 5 कोटींच्यावर रक्कम जप्त केली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर अडीच महिन्याच्या तपासानंतर बँकेचा कॅश कस्टोडियन मॅनेजर अल्ताफ शेख याला पुण्यातून ताब्यात घेतले. सध्या पोलिसांनी 9 कोटी रुपये जप्त केले.

ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त कारवाई करत शेखसह त्याची बहिण निलोफर आणि इतर पाच आरोपींना अटक करत पुढील तपास सुरू केला आहे.