बदलापुरात मोठा आर्थिक घोटाळा; रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि माजी सरपंचांना अटक, नेमकं प्रकरण काय?

| Updated on: Feb 05, 2025 | 9:29 PM

शिवसेना शिंदे गटात असलेले रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात असलेले नेरळचे माजी सरपंच भगवान चंचे यांचाही समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.

बदलापुरात मोठा आर्थिक घोटाळा; रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि माजी सरपंचांना अटक, नेमकं प्रकरण काय?
प्रातनिधिक छायाचित्र
Follow us on

बदलापुरातून जाणाऱ्या बडोदा जेएनपीटी महामार्गाच्या भूसंपादनात जागा मालक असलेल्या आदिवासींची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. यात शिवसेना शिंदे गटात असलेले रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात असलेले नेरळचे माजी सरपंच भगवान चंचे यांचाही समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

बदलापूरच्या ग्रामीण भागातून जाणाऱ्या बडोदा जेएनपीटी महामार्गासाठी काही वर्षांपूर्वी भूसंपादनाची प्रक्रिया पार पडली होती. या भूसंपादनात १० आदिवासी जागा मालकांच्या बँक खात्यात 74 लाख 50 हजार रुपये आले. मात्र या आरोपींनी परस्पर हे पैसे स्वतःच्या आणि निकटवर्तीयांच्या खात्यात वळवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

चार जणांना अटक

या प्रकरणी चार जणांना अटक केली असून यात रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, नेरळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भगवान चंचे, संजय गिरी आणि समीर वेहळे अशा चौघांची नावे आहेत. तसेच याप्रकरणी आणखी ५ ते ६ आरोपींचा शोध सुरु आहे, अशी माहिती बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी एपीआय गोविंद पाटील यांनी दिली.

या प्रकरणात थेट सत्ताधारी पक्षात असलेल्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आणि माजी सरपंचांना अटक झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये काही तत्कालीन सरकारी अधिकाऱ्यांचाही सहभाग होता का? हे देखील आता पोलीस तपासात समोर येणार आहे.