मुंबई : सुट्ट्यांचा सिझन सुरू झाला असून अनेक जणांनी थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाण्याचे मस्त प्लानिंगही आखले असेल. परंतू तुम्ही जरी नामांकित ट्रव्हल कंपनी मार्फत सहलीला जात असाल तरी सावधानता बाळगण्याची गरज आहे. कारण मुंबईच्या प्रसिद्ध वीणा वर्ल्ड या ट्रॅव्हल कंपनी मार्फत जम्मू – कश्मीराला फिरायला गेलेल्या तब्बल 28 जणांची फसवणूक झाली आहे. त्यांना नेमके कशाप्रकारे फसवले याची बातमी ऐकाल तर तुमता मान्यताप्राप्त पर्यटन कंपनीवरील विश्वास उडेल.
उत्तर कश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील जगातील दुसऱ्या क्रमांकाची उंच केबल कार असून त्यातून कश्मीरचा नजारा पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. मुंबईतून 28 पर्यटक कश्मीरच्या सहलीसाठी वीणा वर्ल्ड या प्रख्यात ट्रॅव्हल कंपनी बरोबर गेले होते. ते गुलमर्गच्या एका रिसोर्टमध्ये उतरले होते. परंतू जेव्हा ते गोंडोला केबल कारमधून सैर करण्यासाठी गेले तेव्हा त्यांची तिकीटे नकली असल्याचे उघडकीस आले आहे.
प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, गुलमर्ग गोंडोला प्रकल्पाच्या तिकीट स्कॅनिंग टीमला मुंबईतून आलेल्या 28 पर्यटकांच्या गटाची तिकीटे फेक आढळली आहेत. गुलमर्ग गोंडोला स्टेशनच्या स्कॅनिंग पॉइंटवर ही तिकीटे स्कॅन केली असता ती चक्क बनावट असल्याचे उघडकीस आले. या गटाच्या टुर मॅनेजरकडील सर्व 28 तिकीटे ही संगणकावर तयार केल्याचे चौकशीत आढळून आले आहे.
जम्मू – कश्मीर केबल कार कार्पोरेशन यांनी सांगितले की, आमच्याकडे गुलमर्ग गोंडोला प्रकल्पात अशा प्रकारच्या बनावट तिकीटांना ओळखण्याची यंत्रणा आहे. प्रकल्पातील आमच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने ही तिकीटे जेव्हा बारकाईने पाहीली तेव्हा ती बनावट असल्याचे आढळले. कंपनीच्या टूर मॅनेजरने कबूल केले की त्यांनी स्वतः ही तिकिटे मुंबईत संगणकावर केली आहेत. प्रवाशांचा या बेकायदेशीर कृत्यात काहीही सहभाग नसल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात वीणा वर्ल्ड कंपनी विरोधात पर्यटकांनी फसवणूकीचे केस दाखल केली आहे.
जम्मू – कश्मीर केबल कार कार्पोरेशन यांनी सांगितले की, पर्यटकांना सावधान करत दलालांच्या जाळ्यात न अडकता गुलमर्ग गोंडोलाची तिकीट कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून खरेदी करावीत असे म्हटले आहे. डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट जम्मूकश्मीर केबलकार डॉट कॉम वर ऑनलाईन तिकीटे उपलब्ध आहेत.