बीड : बीड (Beed) जिल्हामध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. आता तर चक्क पोलिस ठाण्यापासून अवघ्या 200 मीटरवर असणाऱ्या मोबाईल शॉपीच्या (Mobile shop) भीतीला भगदाड पाडून चोरट्यांनी मोठा हात मारला. ही घटना बीडमधील केज येथे घडली असून पोलिस ठाणे इतक्या जवळ असूनही चोरी कशी होऊ शकते, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला आहे. पोलिसांच्या (Police) नाकावर टिच्चून चोरी करत चोरांनी मोबाईल, हेड फोन, पॉवर बँक आणि इतर काही महत्वाचे साहित्य चोरून नेले आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज येथील केज-कळंब आणि केज-बीड रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौका जवळ आणि पोलीस ठाण्यापासून अवघ्या दोनशे ते अडीचशे मीटर अंतरावर सचिन ज्ञानोबा देशमुख (रा. वरपगाव ता. केज ह. मु. केज) यांचे मोबाईल विक्री व दुरूस्तीचे श्रीराम मोबाईल शॉपी आहे. दि. 2 जुलै शनिवार रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास चोरट्यानी मागील बाजूच्या भिंतीला भगदाड पाडून दुकानात प्रवेश केला. मोबाईल शॉपीतील मोबाईल, हेड फोन, ब्ल्यू टूथ, पॉवर बँक, चार्जर आणि चार्जिंग कॉर्ड असे सुमारे एक लाख रु किमतीचे मोबाईल व साहित्य लंपास केले.
श्रीराम मोबाईल शाॅपिच्या तिजोरीत महागडे व नामांकित कंपन्यांचे मोबाईल ठेवलेले होते. परंतु सुदैवाने चोरट्यांना तिजोरी फोडता न आल्यामुळे लाखो रुपयांची चोरी टळली.
मोबाईल शॉपीमध्ये सीसीटीव्ही असून चोरट्यानी आत प्रवेश केल्यानंतरच्या हालचाली त्यात कैद झालेल्या असून एकाच्या तोंडावर मास्क आहे तर दुसऱ्याने कापडाने तोंड झाकले आहे. या चोरांनी शाॅपीमध्ये नेमके काय केले हे सर्व कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे.
मोबाईल शॉपीतील चोरीचा तपास लावण्यासाठी ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथक घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी तपास सुरू केला आहे. घटनास्थळीं आढळलेल्या एक टॉवेल श्वानला हुंगण्यास दिली असता श्वान हे जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणा शेजारी असलेल्या मस्जिद परिसर आणि केज-कळंब रोड जवळ त्याने माग काढला.