भंडारा / तेजस मोहतुरे : मासे पकडण्यासाठी तलावात गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्हाच्या लाखनी तालुक्याच्या मानेगाव शिवारात घडली आहे. बिरजूसिंग चित्तोडीया आणि कृष्णा रामसिंग चित्तोडीया अशी मयत तरुणांची नावे आहेत. हे तरुण मूळचे वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील असून, कामधंद्याच्या निमित्ताने त्यांचे कुटुंब भंडाऱ्यात राहते. घटनेची नोंद लाखनी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मानेगाव-सडक शिवारात आयुर्वेदिक औषधी विक्रीसाठी आर्वी (जि.वर्धा) येथील 8 ते 10 कुटुंबीय आपल्या बिऱ्हाडासह राहतात. काही दिवसांपूर्वी मानेगाव शिवारातील मोकळ्या जागेत तंबू ठोकून ही कुटुंब येथे वास्त्यव्यास आहेत. दररोज आंघोळीसाठी गाव तलावात जात असल्याने त्यांना गाव तलावाची माहिती होती.
दरम्यान लाखनी येथील आठवडी बाजार असल्याने तंबूतील काही लोक औषधी विक्रीसाठी गेले होते. तर बिरजूसिंग आणि कृष्णा हे तरुण आपल्या तंबूवर होते. यावेळी मासे पकडण्यासाठी ते गाव तलावात गेले. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. ही बाब तिथेच असलेल्या एका इसमाच्या लक्षात आली. त्याने आरडाओरड करत मदतीसाठी लोकांना गोळा केले.
घटनेची माहिती लाखनी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत उपस्थित नागरिकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढले. यानंतर त्यांना तात्काळ लाखनी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.