भंडारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी( Prime Minister Narendra Modi ) आणि इतर नेत्यांबाबत फेसबुकवर(Facebook) आपत्तीजनक मजकूर पोस्ट करून समाजात वैमनस्य निर्माण करणाऱ्या भंडारा(Bhandara) येथील पोलीस उपनिरीक्षकालाच निलंबित करण्यात आले आहे. भंडारा पोलीस अधीक्षकांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे भंडारा आणि नागपुरातील पोलीस अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
भंडारा येथे तैनात असलेले उपनिरीक्षक सूर्यवंशी काही दिवसांपासून नेता आणि व्यवस्थेविरुद्ध वादग्रस्त मजकूर पोस्ट करीत होता. फेसबुकवर त्याची फ्रेंड लिस्ट लिमीटेड होती. त्याच्याशी निगडित व्यक्तींची संख्या कमी असल्यामुळे त्याच्या पोस्टकडे कोणाचे लक्ष गेले नाही.
मात्र, मागील काही दिवसांपासून सूर्यवंशी अत्यंत गंभीर पोस्ट करीत होता. तो अनेक राजकीय नेते तसेच त्यांचे कुटुंबीय यांच्यासह धार्मिक आयोजनांवर वैमनस्य निर्माण करणाऱ्या पोस्ट फेसबुकवर अपलोड करत होता.
शनिवारी सामाजिक कार्यकर्ता सुशील चौरसिया यांनी नागपुर जिल्ह्याच्या कोतवाली ठाण्यात त्याच्या या वादग्रस्त पोस्ट बाबत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी सूर्यवंशी विरुद्ध 294 295 (अ), 500, 504, आयटी एक्ट 67 नुसार गुन्हा दाखल केला. ही बाब लक्षात येताच भंडाऱ्याचे पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी सूर्यवंशींच्या निलंबनाचा आदेश काढला आहे.
विशेष म्हणजे सूर्यवंशी शिपाई म्हणून नागपूर पोलीस दलात सामील झाला होता. त्याने तहसील तसेच पाचपावली ठाण्यात काम केले आहे.
बंगाली पंजामध्ये गुन्हेगारांच्या दोन गटांत झालेल्या गोळीबाराच्या तपासात निष्काळजीपणा दाखविल्याबद्दल त्याला तहसील ठाण्यातून नियंत्रण कक्षात हलविण्यात आले होते.
फेब्रुवारी महिन्यात त्याची भंडारा येथे बदली झाली आहे. यापूर्वी त्याने फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला होता. परंतु कोणी त्याला गांभीर्याने घेतले नव्हते.
मात्र, आता गुन्हा नोंद झाल्यानंतर भंडारा पोलीस अधिक्षकांनी त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. या प्रकरणामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.