भंडारा : भंडारा जिल्ह्यातील प्लॉट व्यावसायिकाच्या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना दहा दिवसांनी यश आलं आहे. प्लॉट व्यावसायिक समीर दास यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे. चार लाखांची सुपारी देऊन दास यांची हत्या केल्याचं समोर आलं आहे. (Bhandara Property Dealer Sameer Das Murder Case Solved)
प्रॉपर्टी खरेदी-विक्रीतून वाद
भंडारा येथील प्रसिद्ध प्लॉट व्यावसायिक समीर दास यांची 4 एप्रिल रोजी हत्या झाली होती. समीर दास यांनी भंडारा शहरा नजीक अनेक बेनामी प्रॉपर्टी खरेदी करुन ठेवल्या होत्या. या प्रकरणी अनेक कोर्ट केसेस न्यायालयात दाखल होत्या. त्यामुळे समीर दास यांचे अनेक जणांशी शत्रुत्व असल्याचेही बोलले जात होते.
कोर्टाबाहेर प्रकरण सोडवण्यावरुन सुपारी
अशाच एका पाच कोटी रुपयांच्या जमीन खरेदी प्रकरणात दास यांना कोर्टाने अडवून ठेवले होते. हे प्रकरण कोर्टाबाहेर सोडवण्यासाठी जमीन मालक राहुल भोंगाडे याने श्रीकांत येवले आणि आकाश महालगावे या दोघांना चार लाखांची सुपारी दिली होती. समीर दास यांची हत्या करण्याचे काँट्रॅक्ट दोघांना दिल्याचे पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले आहे. या प्रकरणी भाबदर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
नवी मुंबईत कुटुंबाचा कोयता हल्ला
नवी मुंबईत दोन कुटुंबांमध्ये सुरु असलेल्या वादाचे रुपांतर खुनी हल्ल्यात झाले. कोपरी गावात तिघा जणांवर कोयत्याने हल्ला करण्यात आला. यामध्ये बहीण-भाऊ गंभीर जखमी झाले असून दुसऱ्या भावाची प्रकृती स्थिर आहे. छेड काढल्याची तक्रार पोलिसात केल्यावरुन दोन कुटुंबांमध्ये वाद सुरु झाला. त्यातूनच हा कोयता हल्ला झाल्याची माहिती आहे.
छेड काढल्याचा आरोप करत काजल नावाच्या तरुणीने पोलिसात तक्रार केली होती. याच गोष्टीचा राग मनात धरुन आरोपी कुटुंबाने कोयत्याने हल्ला केल्याचा दावा केला जात आहे. रितिक आणि अमित हे भाऊ, तर त्यांची बहीण काजल हिच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. एकाच कुटुंबातील तिघांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने नवी मुंबईत एकच खळबळ उडाली.
संबंधित बातम्या :
मुंबईत हॉटेलमध्ये क्वारंटाईन असलेल्या महिलेचा विनयभंग; वैद्यकीय कर्मचाऱ्याला अटक
मॉलबाहेर पोलिसाचा दाम्पत्यावर गोळीबार, व्हायरल व्हिडीओमागील सत्य काय?
(Bhandara Property Dealer Sameer Das Murder Case Solve)