नंदुरबार : नंदुरबारमधील भाजप नगरसेवक गौरव चौधरी यांनी तहसीलदार नियुक्त वाळू तपासणी पथकातील महिला तलाठींना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पथकातील महिला तलाठी निशा पावरा यांना नगरसेवक गौरव चौधरी यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे (BJP corporator beats up woman officer for blocking sand truck).
नेमकं काय घडलं?
गौरव चौधरी यांच्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाकडे गुजरातमधून महाराष्ट्रात वाळू वाहतुकीची झिरो स्वामीत्व पावती नव्हती. त्यामुळे या तपासणी पथकाने दोन तास वाळू वाहतूक करणारा ट्रक अडवला. यानंतर ट्रकच्या ड्रायव्हरने ट्रक पळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी निशा पावरासह अन्य दोन महिला तलाठी कर्मचाऱ्यांनी तहसीलदार यांच्या वाहनातून पाठलाग करुन ट्रक अडवला (BJP corporator beats up woman officer for blocking sand truck).
यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या नगरसेवक गौरव चौधरी आणि पथकातील महिला तलाठींमध्ये वाद झाला. यावेळी नगरसेवक गौरव चौधरी यांनी महिला तलाठींसोबत शिवीगाळ करत त्यांना धक्काबुकी करुन मारहाण केली. यानंतर संतप्त तलाठींसह महसुलच्या सर्व अधिकाऱ्यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात ठाण मांडून याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
नगरसेवकाची भूमिका काय?
दुसरीकडे नगरसेवक गौरव चौधरी यांनी या पथकावर वाळू ट्रक अडवून पैशांची मागणी करण्याचा आरोप केला आहे. आपण कोणालाही मारझोड केली नसून संबंधित महिला तलाठी या पाय अडकून खाली पडल्याचा त्यांनी दावा केला आहे. त्यांच्या वाहन चालकांनी या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात देखील तक्रार दिली आहे. दरम्यान या घटनेनंतर या पथकातील अन्य महिला तलाठी प्रचंड ताणतणावात असून त्यांनी याप्रकरणी न्यायाची मागणी केली आहे.
संबंधित बातम्या :