अहमदनगर : राहुरीतील पत्रकाराच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात झालेले आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी फेटाळले. अहमदनगर जिल्ह्यातील ज्या भूखंडाच्या वादातून पत्रकार रोहिदास दातीर यांची हत्या झाली तो भूखंड प्राजक्त तनपुरे यांचा असल्याचा आरोप भाजपचे माजी आमदार शिवाजी कार्डिले यांनी केला होता. कर्डिलेंकडे काही पुरावे असतील त्यांनी तात्काळ पोलिसांकडे सादर करावेत, अशी मागणी तनपुरेंनी केली. (BJP Leader Shivaji Kardile accusation on Minister Prajakt Tanpure over Ahmednagar Journalist Murder)
शिवाजी कर्डिले यांनी राजकारणातून आरोप केल्याचा दावा प्राजक्त तनपुरेंनी केला. 18 एकर भूखंडाबाबत दातीर आणि पठारे कुटुंबियात वाद होते. कर्डिलेंकडे काही पुरावे असतील तर त्यांनी तात्काळ पोलिसांकडे सादर करावेत. पोलिसांनी योग्य तपास करावा, अशी भूमिका प्राजक्त तनपुरे यांनी मांडली.
आरोपीकडून हत्येची कबुली
राहुरी येथील एका साप्ताहिकाचे पत्रकार आणि माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास दातीर यांची 6 एप्रिल रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी राहुरी पोलिसांनी माळी नावाच्या आरोपीला अटक केली असून त्याने दातीर यांच्या हत्येची कबुलीही दिली आहे. तसेच तनपुरे यांच्या कंपनीच्या भूखंडाच्या वादातूनच हत्या केल्याची कबुली संशयित आरोपीने दिली, असा दावा भाजप नेते शिवाजी कार्डिले यांनी केला आहे.
रोहिदास दातीर यांनी पोलिसात तक्रार केली होती
रोहिदास दातीर यांचं राहुरी येथील मल्हारवाडी रोडवरुन दिवसा ढवळया अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची अमानुषपणे हत्या करुन त्यांचा मृतदेह शहरातील कॉलेजरोड परिसरात आणून टाकण्यात आला. मयत दातीर यांना यापूर्वी जीवे मारण्याची धमकी देणे, हल्ला करणे असे प्रकार घडले होते या बाबत दातीर यांनी राहुरी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तसेच आपल्या जीवितास धोका असल्याने पोलिस संरक्षण मिळावे, अशी मागणीही केली होती, असं कार्डिले यांनी म्हटलं आहे.
कलम 302 लावण्याची मागणी
अटकेतील आरोपीने दिलेल्या कबुली जबाबात राहुरी लगतच्या भूखंडाच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे या 18 एकर भूखंडाच्या उताऱ्यावर ज्यांची ज्यांची नावे आहेत, त्यांच्यावर कलम 302 चा गुन्हा दाखल करावा. तनपुरे कुटुंब हे नगरपालिकेच्या माध्यमातून जागांवर आरक्षण टाकून जागा बळकावण्याचे काम करत आहे. आधी भूखंडावर आरक्षण टाकायचे, नंतर तो भूखंड विकत घेऊन नंतर त्यावरचे आरक्षण उठवण्याचे काम केले जात आहे, असा आरोप करतानाच या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी कान्हू मोरे याला अटक केल्यास या कटामागील मुख्य सूत्रधारांचा तपास लागेल, असं शिवाजी कर्डिले यांनी म्हटलं आहे.
संबंधित बातम्या:
पत्रकाराची हत्या; ठाकरे सरकारचा आणखी एक मंत्री गोत्यात?
अहमदनगरमध्ये पत्रकाराची दगडाने ठेचून हत्या, राहुरीत मृतदेह आढळला
(BJP Leader Shivaji Kardile accusation on Minister Prajakt Tanpure over Ahmednagar Journalist Murder)