जालन्यातील गोंदी येथील शाळेत एक भयानक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत जादूटोण्यासारखे कृत्य केल्याची घटना समोर आली असून प्रचंड खळबळ माजली आहे. शाळेच्या एका वर्गामध्ये जादूटोण्याचं काही सामान ठेवल्याचं दिसल्याने शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण होतं आणि ते पाहून अनके विद्यार्थ्यांनी जीवाच्या भीतीने पटापट वर्गाबाहेर पळ काढला. याप्रकरणी शालेय व्यवस्थापन समितीने पोलिसांना निवेदन दिलं आहे. मात्र पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल करून न घेतल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी शिक्षण विभागाने शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचे आदेश दिले होते. मात्र जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचेही दिसत असून अनागोंदी कारभार उघड झालाय.
नेमकं घडलं तरी काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यामधील गोंदी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत जादूटोण्यासारखं कृत्य केल्याचं समोर आलं आहे. तेथील नववीच्या वर्गात हा सगळा प्रकार घडल्याचं उघड झालं आहे. शाळेतील वर्गामध्ये बांगड्या ,वाहिलेलं हळद कुंकू आणि बाहुली आढळून आली. मात्र हा सगळा प्रकार पाहून नववीच्या वर्गातील विद्यार्थी अतिशय घाबरले.जादूटोण्याचं ते सामान पाहून संपूर्ण शाळेत भीतीचं वातावरण निर्माण झालं. धक्कादायक गोष्ट म्हणजे या शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे देखील काही दिवसापूर्वीच चोरी गेल्याची माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी शालेय व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकांनी जालन्यातील गोंदी पोलिसांना निवेदन दिलं. शाळेत घडलेला सर्व प्रकार सांगत जादूटोण्याचा संशय त्यांनी पोलिसांसमोर व्यक्त केला, मात्र पोलिसांनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं असून इतक दिवस उलटूनही अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी शिक्षण विभागाने शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचे आदेश दिले होते मात्र जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने हे प्रकार समोर येत आहे. यामुळे मोठी खळबळ माजली असून .यावर पोलीस कारवाई कधी करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.