विशाखापट्टणम / 26 जुलै 2023 : देशभरातील आयआयटी कॅम्पसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अलीकडेच मुंबईतील पवई आयआयटी कॅम्पसमधील दर्शन सोलंकी या विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणावरून खळबळ उडाली होती. त्यापाठोपाठ आता हैदराबाद आयआयटी कॅम्पसमधील विद्यार्थ्यांच्या संशयास्पद मृत्यूने प्रचंड खळबळ माजली आहे. मागील जवळपास दहा दिवसांपासून बेपत्ता असलेला 20 वर्षीय डी कार्तिक हा मुलगा विझाग शहरात मृतावस्थेत आढळून आला आहे. कार्तिक हा भटक्या जमातीतील अंडरग्रॅज्युएट विद्यार्थी आहे. त्याने आत्महत्या केली असावी, असा दाट संशय वर्तवला जात आहे. मात्र त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप कळले नाही.
कार्तिकच्या मृत्यूबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. कार्तिकच्या आत्महत्येला आयआयटी कॅम्पसमधील मित्रमंडळी कारणीभूत ठरली आहेत का? याबाबत पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे.
शहरातील अरिलोवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत समुद्रकिनाऱ्यावर उडी मारून आपले जीवन संपवले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तसेच अन्य बाबींचाही विचार करुन पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. कार्तिक मंगळवारी सकाळी समुद्रकिनाऱ्याजवळ मृतदेह आढळून आला. यानंतर हैदराबाद आयआयटी कॅम्पसमध्ये प्रचंड खळबळ उडाली. कार्तिकच्या मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले असून घटनास्थळी सापडलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.
कार्तिकने समुद्रात उडी मारली असावी. त्यानंतर त्याचा मृतदेह 20 जुलै रोजी किनाऱ्यावर वाहत आला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. कार्तिकचे शेवटचे लोकेशन 19 जुलै रोजी विझागच्या आरके बीचवर होते, असेही प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
कार्तिक ज्या ठिकाणी शेवटचा दिसला होता, त्या ठिकाणाहून सुमारे 10 किमी अंतरावर मृतदेह कुजलेल्या स्थितीत वाहून आला होता. मृतदेहाच्या पँटच्या खिशात एक मोबाइल फोन सापडला. त्या फोनच्या आयएमईआय नंबरच्या आधारे कार्तिकची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. कार्तिक हा तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यातील असून, तो आयआयटी हैदराबाद येथे बी-टेकच्या द्वितीय वर्षात शिकत होता. कार्तिक खूप हुशार विद्यार्थी होता. तसेच आयआयटीमध्ये शिकणारा गावातील पहिला आदिवासी मुलगा होता.
कार्तिक आयआयटी कॅम्पसमध्ये असलेल्या वसतिगृहाच्या खोलीतून बेपत्ता झाला होता. त्यानंतर गेले 10 दिवस त्याची सर्वत्र शोधाशोध सुरु होती. अखेर 10 दिवसांनी त्याचा मृतदेह आढळून आला आहे. या प्रकरणी एरिलोवा पोलिसात कलम 174 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कार्तिकने टोकाचे पाऊल का उचलले? की त्याचा घातपात झाला? याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत.