शूजमध्ये पाय घालताच 7 वर्षाचा मुलगा वेदनेने विव्हळू लागला. त्यानंतर आई-वडिलांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र रुग्णालयात नेताच मुलाला एकापाठोपाठ सात वेळा हृदयविकाराचे झटके आले. यानंतर मुलाचा रुग्णालयातच मृत्यू झाला. मुलाच्या शूजमध्ये असलेल्या विषारी विंचू चावल्यामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. ब्राझीलच्या साओ पाउलो शहरात ही घटना घडली आहे.
मयत 7 वर्षाचा मुलगा 23 ऑक्टोबर रोजी आपल्या कुटुंबीयांसह बाहेर फिरायला चालला होता. यासाठी तो तयार झाला आणि शूज घालण्यास गेला. शूजमध्ये पाय घालताच तो वेदनेने विव्हळत ओरडू लागला. त्याला तीव्र वेदना जाणवू लागल्या.
मुलाला पाहून त्याची आई अँजेलिटा खूप घाबरली. तिने मुलाजवळ जाऊन पाहिले असता मुलाचा पाय लाल झाला होता. तिने आजूबाजूला कोणता प्राणी आहे का पाहिले तर काहीच दिसले नाही. म्हणून तिने शूजमध्ये पाहिले तर आत विषारी विंचू होता.
शूजमध्ये ब्राझिलियन पिवळा विंचू होता, जो जगातील सर्वात विषारी विंचूंपैकी एक आहे. या विंचूला टायटस सेरुलेटस असेही म्हणतात. हा सर्वात विषारी विंचू मानला जातो. या विंचूने दंश केल्यानंतर कोणाचाही जीव जाऊ शकतो.
यानंतर मुलाचे कुटुंबीय त्याला रुग्णालयात घेऊन गेले. रुग्णालयात डॉक्टरांनी तात्काळ मुलावर उपचार सुरु केले. मात्र रुग्णालयातच मुलाला सात वेळा हृदयविकाराचा झटका आला आणि 25 ऑक्टोबर रोजी मुलाचा मृत्यू झाला.