ठाणे : डोंबिवलीमधून 9 नोव्हेंबरला एका 12 वर्षाच्या मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार मानपाडा पोलीसांनी मिळाली होती. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांकडून गुप्त पद्धतीने तपास सुरू झाला. दीड कोटी रुपयांच्या खंडणीसाठी या मुलाला थेट क्लासच्या बाहेरुन आरोपींनी उचललं होतं. मुलगा वेळेवर घरी न आल्याने पालक चिंतेत पडले. त्यात एक कॉल आला मग पालक पुरते हादरले. त्यामुळे त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी संबंधित प्रकार ऐकून घेतला आणि मुलाला सुखरूप घरी आणण्यासाठी पोलिसांचे मिशन सुरू झाले. अखेर पोलिसांचं 72 तास सुरू असलेल्या मिशनला यश आलंय. धक्कादायक बाब म्हणजे मुख्य आरोपी हा सराईत गुन्हेगार होता. जीवाची पर्वा न करता पोलिसांनी या मुलाला गुजरातमधून सुखरूपपणे घरी आणलं. शेकडो पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीने चिमुकला आज पुन्हा आपल्या कुटुंबासोबत घरी गेला.
डोंबिवलीत राहणारे रणजीत झा यांनी मुलगा हरवल्याची तकार मानपाडा येथे केली होती. 12 वर्षांचा मुलगा हा सकाळी क्लाससाठी गेला. मात्र अपेक्षित वेळेत तो परत आला नाही, असं तक्रारीत नमूद करण्यात आलं. त्यानंतर झा यांना एक फोन आला “तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे, मुलगा परत पाहिजे असेल तर एक कोटी रुपये द्या, नाहीतर मुलाला मारून टाकू”, अशी धमकी फोनवर देण्यात आली.
घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तपासाचे नियोजन केले. 20 टीम तयार करण्यात आल्या. पोलिसांनी ज्या ठिकाणी अपहरण झाले त्या जागेला भेट दिली. त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली. सर्वप्रथम आरोपी कोणत्या गाडीतून आले होते, याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्यानंतर ही गाडी खडवली मार्गे जव्हारच्या दिशेने रवाना झाल्याचं समोर आलं.एक पथक जव्हारला पाठवण्यात आलं.
या दरम्यान आरोपी मुख्य रस्त्याचा वापर न करता आड मार्गाचा वापर करत नंबर प्लेट बदलत असल्याचं दिसून आलं. 10 नोव्हेंबरला पुन्हा झा यांना फोन आला. “तुम्ही मला सिरीयस घेत नाही, असं वाटतं. आता एक कोटी नाही तर दीड कोटी आम्हाला पाहिजे. 3 तासात आम्हाला पैसे पाहिजे”, असं सांगण्यात आलं. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी हे सराईत गुंड असल्याने पोलीसांचं टेन्शन आणखी वाढलं.
त्यानंतर नाशिक परिसरात एक टीम रवाना करण्यात आली. नाशिक ग्रामीण पोलिसांचीही मदत घेण्यात आली. फक्त पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपी नाशिकमध्ये आल्याचं समोर आलं. दरम्यान जव्हार मोखाडा परीसरात तपास करणाऱ्या पोलीस पथकाला आरोपींची गाडी जव्हार दिशेने भरधाव वेगाने जाताना दिसली. यावेळी या गाडीला अटकाव करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. मात्र, त्यांनी थेट पोलिसांच्या अंगावर गाडी घातली.
या घटनेत पोलीस थोडक्यात वाचले. त्यानंतर गाडी सोडून आरोपी बाजूला असलेल्या जंगलात पळून गेले. स्थानिक पोलीस, डॉग स्कॉड पोलीस पथक, नागरिक यांच्या मदतीने जंगल परिसर पिंजून काढण्यात आला. मात्र अंधाराचा फायदा घेत आरोपी पसार झाले. आरोपींना जो पकडून देईल त्यांच्यासाठी 50 हजार रोख रक्कमेचे बक्षिस सुद्धा जाहीर करण्यात आले. गाडीतून हत्यार, अपहरण झालेल्या मुलाची चप्पल आणि शाळेची वही या गोष्टी सापडल्या. दरम्यान आरोपी गाडीचे प्लेटनंबर वारंवार बदलत असल्याचं आढळून आले.
धक्कादायक बाब म्हणजे या अपहरणाचा मास्टरमाइंड फरहदशाह फिरोजशाह राफाई असल्याचं पोलिसांना समजलं. गुजरात येथे त्याच्यावर डबल मर्डर, अवैध दारू विक्री, घरफोडी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे हा गुन्हा अधिक संवेदनशील आणि गुंतागुंतीचा होत चालला होता. आरोपी हे जंगलातून पालघर मार्गाने गुजरातकडे पलायन करत असल्याची माहिती गोपनीय विभागाला मिळाली.
यावेळी गुजरात राज्यातील स्पेशल ऑपरेशन ग्रुप यांच्या मदतीने नाकाबंदी लावण्यात आली. मात्र पोलिसांना चकवा देण्यात आरोपी यशस्वी झाले. आरोपी हे गुजरातमधील भावनगर सुरत येथे जाण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे पोलीस सावध झाले. त्याच दरम्यान आरोपीने पालघर येथील घरातून सर्व सामान एका मालवाहू टेम्पोच्या मदतीने सुरतला नेल्याची माहिती गोपनीय विभागाला मिळाली. हा धागा पकडत पोलिसांनी पालघरमधील सर्व टेम्पो पिंजून काढले. अखेर त्यांना पाहिजे होता तो टेम्पो मिळालाच.
आता तपास खूप पुढे सरकला होता. आरोपीचा सुरत येथील पत्ता पोलिसांना मिळाला. सावधानता बाळगत पोलिसांनी या घरावर छापा टाकत मुलाची सुखरुप सुटका केली. त्यानंतर अक्षरशः पोलीस या मुलाला खांद्यावर घेऊन नाचले.
फरहदशहा रफाई, प्रिन्सकुमार सिंग, शाहीन मेहतर, फरहीन सिंग, नाझीया रफाई अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. यामध्ये तीन महिलांचा समावेश असून एक मुख्य आरोपीची पत्नी, मैत्रीण आणि आई यांचा समावेश आहे. अपहरण झालेल्या मुलाला कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास देण्यात आला नाही, असे त्याने सांगितलं. तर पालक, नागरीक आणि नातेवाईक यांनी पोलीसांचे आभार मानले.