ग्रेटर नोएडा : दोघांची इन्स्टाग्रामवर मैत्री झाली. ती त्याच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठी होती. मात्र वयाची बंधनं झुगारुन दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. मग प्रेयसी लग्नाचा तगादा लावू लागली आणि इथेच गडबड झाली. प्रियकराला तिच्याशी लग्न करायचे नव्हते. मात्र प्रेयसी लग्नासाठी दबाव टाकत असल्याने प्रियकारने तिच्या हत्येचा कट रचला आणि तो अंमलात देखील आणला. प्रेयसीची हत्या केल्यानंतर मृतदेह तलावात फेकून दिला. पोलिसांना तलावात मृतदेह आढळल्यानंतर त्यांनी घटनेचा तपास सुरु केला. अवघ्या पाच दिवसात हत्याकांडाचा उलगडा करण्यास पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे.
पोलिसांना तलावात मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. पोलीस चौकशीत तरुणीची ओळख पटली. साहिबा असे तरुणीचे नाव आहे. साहिबा मूळची उत्तर प्रदेशातील गाझियाबादची रहिवासी असून, सध्या हैबतपूरमध्ये भाड्याच्या घरात राहत होती. पोलिसांनी तिच्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. यानंतर साहिबाच्या भावाने तिचा प्रियकर जितेंद्र भाटी याच्यावर हत्येचा आरोप केला. यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. यानंतर पोलिसांनी जितेंद्रला ताब्यात घेत चौकशी केली असता धक्कादायक खुलासा झाला.
साहिबा आणि जितेंद्र यांची नोव्हेंबर 2022 मध्ये इन्स्टाग्रामवर मैत्री झाली. यानंतर दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. मग तरुणी डिसेंबर 2022 मध्ये गाझियाबादहून हैबतपूरला शिफ्ट झाली. जितेंद्र तिला नेहमी भेटायला जायचा. त्यावेळी शेजारी तरुण कोण आहे हे विचारायचे. मग दोघांनी आपण पती-पत्नी असल्याचे सांगत एकत्र रुममध्ये राहू लागले. लोकांना विश्वास बसावा म्हणून विवाहित स्त्री प्रमाणे सिंदुरही लावत होती.
एकत्र रहायला लागल्यानंतर साहिबा भरपूर दारु पित असल्याचे जितेंद्रला कळले. साहिबा जितेंद्रवर लग्नासाठी दबाव टाकू लागली. पण जितेंद्र 22 वर्षाचा आहे, तर साहिबा 34 वर्षांची होती. तसेच दोघे वेगळे जातीचे असल्याने त्यांच्या घरच्यांनीही त्यांच्याशी संबंध तोडले होते. यामुळे जितेंद्रला तिच्याशी लग्न करायचे नव्हते. लग्नावरुन दोघांमध्ये वाद होऊ लागले.
घटनेच्या दिवशीही दोघांनी दारु पार्टी केली होती. मग दोघांमध्ये पुन्हा लग्नावरुन वाद झाला. यानंतर जितेंद्रने दारुच्या नशेत चाकूने साहिबाच्या हाताची नस कापली. यानंतर तो नशेत झोपून गेला. तीन तासांनी त्याला जाग आली तेव्हा संपूर्ण घरात रक्त पसरले होते. साहिबाचा मृत्यू झाला होता. यामुळे जितेंद्र घाबरला आणि त्याने आधी घर साफ केले. यानंतर गडबडीत साहिबाचा मृतदेह खांद्यावरुन नेत तलावात फेकला.