रायपूर : पैशांवरुन झालेल्या वादातून व्हॅलेन्टाईन डे च्या दुसऱ्याच दिवशी एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची हत्या केल्याची खळबळजनक घटना छत्तीसगडमधील रायपूरमध्ये उघडकीस आली आहे. माथेफिरु तरुणाने प्रेयसीचे शीरच धडापासून वेगळे केले. घटनेची माहिती मिळताच गुढियारी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मोहम्मद सुल्तान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. इमराना असे मयत प्रेयसीचे नाव आहे.
44 वर्षीय इमराना आणि 22 वर्षीय सुल्तान यांची अडीच वर्षांपूर्वी एका बिर्यानी सेंटरमध्ये ओळख झाली होती. यानंतर दोघांमध्ये नियमित बोलणे सुरु झाले. हळूहळू मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. गेल्या अडीच वर्षापासून दोघे प्रेमसंबंधात आहेत.
सुल्तान आज प्रेयसीला भेटण्यासाठी मुर्रा भट्टी परिसरात आला होता. यावेळी दोघांमध्ये पैशांवरुन वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की सुल्तानने भिंतीवर इमरानाचे डोके आदळले. मग तोंडावर उशी दाबून तिची हत्या करत गळा चिरला.
मयत महिला आधीपासून विवाहित असून, तिला दोन मुलं देखील आहेत. ही हत्या एकतर्फी प्रेमातून झाल्याचे बोलले जाते. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. तपासाअंती सर्व उघड होईल.