खुंटी : जमिनीच्या वादातून भावानेच भावाची अपहरण करत हत्या केल्याची धक्कादायक घटना झारखंडमधील खुंटी जिल्ह्यात घडली आहे. हत्येनंतर मृतदेहाचे दोन तुकडे करत वेगवेगळ्या ठिकाणी गाडले. हत्येनंतर सर्व आरोपी ओडिसाला पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र त्याआधीच सिमडेगा पोलिसांच्या मदतीने खुंटी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली. या हत्याकांडात एका महिलेचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. कानू मुंडा असे मयत तरुणाचे नाव आहे.
खुंटी जिल्ह्यातील मुंडा टोली गावातील कानू मुंडा याचा आपला चुलत भाऊ सागर मुंडा याच्याशी जमिनीवरुन वाद सुरु होता. या वादातून सागर मुंडा याने कानूच्या हत्येचा कट रचला. यासाठी सागरने आपल्या दोन साथीदारांसह 1 डिसेंबर रोजी राहत्या घरातून कानूचे अपहरण केले.
अपहरण केल्यानंतर कानूची धारदार शस्त्राने गळा चिरत हत्या केली. हत्येनंतर मृतदेहाचे दोन तुकडे केले. शिर डुलवा टोंगरी येथील पैलोल डॅमजवळ नाल्यात गाडले. तर धड तेथून 15 किमी दूर गोपला जंगलात गाडले.
घटनेनंतर सागर मुंडा आणि त्याची पत्नी चंदमणी गुडिया, भाऊ सीनू मुंडा, अमरजीत पूर्ती, जयमसिह ओडेया आणि अनमोल तुती हे बोलेरो कारमधून ओडिसात पळून जात होते. मात्र खुंटी पोलिसांनी सिमडेगा पोलिसांच्या मदतीने बिरदा ओपी गावातून सर्वांना अटक केली.
आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सदर ठिकाणी दाखल होत मृतदेहाचे शीर आणि धड ताब्यात घेतले. तसेच हत्येत वापरलेली बोलेरो गाडी आणि कुदळही ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून कानूचा मोबाईलही जप्त करण्यात आला आहे.
मुंडा बंधूंच्या आजोबांची खुंटी शहरातील उच्चभ्रू परिसरात जमिन होती. सांगर मुंडा ही जमिन विकू इच्छित होता. मात्र कानू मुंडाचा जमिन विकण्यास नकार होता. याच कारणातून दोघांमध्ये वाद सुरु होता.
याच वादातून सागरने कानूची हत्या करुन जमिन हडपण्याचा कट रचला. यासाठी त्याने साथीदारांच्या मदतीने कानूचे अपहरण केले. त्यानंतर डोंगराळ परिसरात आधी त्याला जबर मारहाण केली. मग धारदार शस्त्राने गळा चिरुन त्याची हत्या केली. यानंतर शीर आणि धड वेगळे करत शीर हातात घेऊन फोटोही काढला.