ठाणे / 19 ऑगस्ट 2023 : बंगल्याच्या डागडुजीसाठी पैशांची गरज असल्याचे सांगत बिल्डरने फायनान्सरची 20 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना ठाण्यात घडली. याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी बिल्डर चेतन पटेलला अटक केली आहे. तर अन्य दोन आरोपी चारू तोलाट आणि अंबालाल पटेल हे सध्या फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. केकिन आर शाह असे पीडित फायनान्सरचे नाव आहे. आरोपी चारु तोलाट याने ओळखीचा फायदा घेत फसवणूक केली. आरोपीने अशाच प्रकारे आणखी व्यासायिकाची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. पोलीस याप्रकरणी सखोल तापस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि तोलाट हे दोघे अंधेरीतील जुहू परिसरात 16 वर्षांपासून एकमेकांचे शेजारी होते. काही महिन्यांपूर्वी चेतन आणि अंबालाल यांच्यासह बिल्डर चेतन पटेल हे शाह यांच्याकडे गेले. त्यांनी आपली कंपनी एन.के.कन्स्ट्रक्शन अलिबागमधील जुन्या बंगल्यांचा पुनर्विकास करत असल्याचे सांगितले. आरोपींनी शाह यांना बंगलाही दाखवला. तसेच 9 महिन्यात कर्ज फेडण्याचे आश्वासनही दिले.
कर्जाच्या परतफेडीसाठी आरोपींनी फिर्यादीला सात पोस्ट-डेट चेक दिले होते. मात्र हे चेक दिलेल्या तारखांना जमा केल्यानंतर बाऊन्स झाले. शहा यांनी नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्यांच्या ठाणे कार्यालयातून जारी केलेल्या धनादेशाद्वारे पैसेही दिले.
आणखी एका व्यावसायिकानेही आरोपीविरुद्ध 65 लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केल्याचे कळते. यावरुन या तिघांनी अनेकांची अशा प्रकारे फसवणूक केली असावी, असा पोलिसांना संशय आहे. त्यानुसार पोलीस पुढील तपास करत आहेत.