बुलडाणा : विवाहितेने चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुलडाण्यात उघडकीस आली आहे. मायलेकीचे मृतदेह स्वतःच्याच शेतातील विहिरीत तरंगताना आढळल्याने एकच खळबळ उडाली. मायलेकीच्या दुहेरी आत्महत्येचं गूढ अद्याप उलगडलेलं नाही. (Buldana Mother Daughter Commits Suicide in farm well)
बुलडाणा तालुक्यातील माळवंडी येथे राहणाऱ्या मायलेकींनी आत्महत्या केली. तीस वर्षीय महिलेने आपल्या तीन वर्षांच्या मुलीसोबत आयुष्याची अखेर केली. पल्लवी गणेश चव्हाण (30) आणि जान्हवी गणेश चव्हाण (3) अशी मयत मायलेकीची नावं आहेत. काल संध्याकाळी दोघींनी आत्महत्या केल्याचा आरोप आहे.
आत्महत्येचं कारण अस्पष्ट
या प्रकरणी मालवंडीचे पोलीस पाटील संजय चव्हाण यांनी रायपूर पोलीस स्टेशनला माहिती दिली होती. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करत मायलेकींचे मृतदेह बाहेर काढले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र या दोघींनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. घटनेचा तपास रायपूर पोलीस करत आहेत.
अकोल्याच्या मायलेकाची बुलडाण्यात आत्महत्या
अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील मन नदीत गेल्या महिन्यात मायलेकाने आत्महत्या केली होती. आधी 15 वर्षीय तरुणाचा मृतदेह नदीत आढळला. तरुणासोबतच त्याच्या आईनेही नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचं नंतर समोर आलं. मायलेकाच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दोघेही जण बुलडाण्याचे रहिवासी असल्याचं समोर आलं आहे.
औरंगाबादेत विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी
कौटुंबिक कलहाला वैतागून औरंगाबादेत विवाहितेने दोन चिमुकल्यांसह आत्महत्या केल्याचा प्रकार गेल्याच महिन्यात समोर आला होता. पडक्या विहिरीत उडी घेऊन महिलेने लेकरांसह आयुष्य संपवलं होतं. पैठण तालुक्यातील गेवराई तांडा गावात ही घटना घडली होती.
वैशाली थोरात यांनी दोन चिमुकल्यांना सोबत घेऊन आत्महत्या केली. गावाशेजारी असलेल्या पडक्या विहिरीत त्यांनी दोन्ही मुलांसोबत उडी टाकली. मात्र महिलेच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता.
संबंधित बातम्या :
बुलडाण्यातील मायलेकाची अकोल्यात आत्महत्या, नदीत उडी घेत आयुष्याची अखेर
विहिरीकाठी चपला काढल्या, मोबाईल-पैसे ठेवले, पुण्यात बापाची दोन लेकींसह आत्महत्या
(Buldana Mother Daughter Commits Suicide in farm well)