गणेश सोळंकी, बुलढाणा : जिल्ह्यातील नांदुरा (Buldhana nandura) तालुक्यात येणाऱ्या वडनेर भोलजी (wadner bholji) गावातून एक तरुणी एका तरुणासोबत पळून गेली, त्यानंतर दोन समाजात जोरात हाणामारी झाली. त्यामुळे वडनेर भोलजी या गावात राज्य राखीव दलाला पाचारण करण्यात आलं आहे. ही घटना दोन दिवसापुर्वी घडली असून आतापर्यंत 47 जणांवर दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे पोलिस (bhandara police) आणि नातेवाईक पळून गेलेल्या जोडप्यांचा शोध घेत आहे. त्याचबरोबर पोलिसांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये असं आवाहन केलं आहे. दोन समाजात झालेल्या वादामुळे अनेकांना मारहाण झाली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात येणाऱ्या वडनेर भोलजी गावातून वेगवेगळ्या समाजातील प्रेमी युगुल पळून गेल्याने दोन गटांमध्ये दोन दिवसांपूर्वी तुफान राडा झाला होता. या राड्या दरम्यान काही दुचाकी आणि दुकानांची सुद्धा जाळपोळ करण्यात आली होती.त्यामुळे गावात तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनी घटनास्थळ गाठत परिस्थिती आटोक्यात आणली असून तब्बल 47 जणांवर दंगलीचे गुन्हे दाखल केले आहेत. तर दोन्ही गटातील 8 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक थोरात यांनी केले आहे.
दोघे पळून गेले आणि गाव भांडतंय अशी चर्चा आहे. तर मुलीला फुस लावून पळवून नेलं असल्याची तक्रार मुलीच्या नातेवाईकांनी दिली आहे. दोन्ही गटात एवढा मोठा राडा झाला की, पोलिसांना तिथं अधिक कुमक मागवावी लागली. मुलीच्या आणि मुलाच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून संपुर्ण गावात तणावजनक स्थिती आहे.