गणेश सोळंकी, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, बुलढाणा | 2 ऑक्टोबर 2023 : राज्यातील अपघातांचे सत्र सुरूच असून बुलढाण्यातही असाच एक दुर्दैवी अपघात घडला आहे. दिवसभराच मरमर कष्ट करून, मेहनत करून रस्त्याच्या कडेला गाढ झोपलेल्या मजुरांची ती झोप अखेरचीच ठरली. भरधाव वेगाने आलेला ट्रक झोपडीत घुसल्याने भीषण अपघात (accident) झाला. या घटनेत १० हून अधिक मजूर चिरडले गेले. त्यापैकी चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर इतर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी या गावाजवळ मुंबई ते नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. हे काम उत्तम रितीने पार पडावे, चांगला रस्ता व्हावा यासाठी अमरावती जिल्ह्यातील मोरगड येथील मजूर रात्रंदिवस घाम गाळून मेहनत करत आहेत. दिवसभराचे काम संपवून रविवारी अनेक मजूर रात्रीच्या वेळेस रस्त्याच्या कडेला टीनशेडमध्ये झोपले. मात्र ती रात्र अखेरची ठरेल याची कल्पना कोणालाच नव्हती.
सोमवारी पहाटे 5:30 च्या सुमारास एक ट्रक भरधाव वेगाने आला आणि त्या टीनशेडमध्ये घुसला. त्या ट्रकखाली काही मजूर चिरडले गेले. त्यापैकी चौघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर उर्वरित नऊ जण गंभीर जखमी झाली असून त्यांना उपाचारांसाठी मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या अपघातानंतर ट्रकचालक ट्रक तेथेच सोडून फरार झाला. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत असून चालकाचाही शोध सुरू आहे.
प्रकाश मकु धांडेकर (वय 26), पंकज तुळशीराम जांबेकर (वय 19), राजाराम दादू जांबेकर (वय 35) आणि अभिषेक जांबेकर (वय 18) अशी मृतांची नावे असून ते सर्वजण मोरगड येथील रहिवासी आहेत.
तर दीपक पणजी बेलसरे, कमल रमेश जांभेकर, अमर बजू , शाम भास्कर, गुणी भुया भोगर भुया, अक्षय कुमार, सतपाल कुमार मलिकचंद, महेश मोची , आशिष कुमार निर्मल भुयार हे अमरावती व इतर राज्यातून आलेले काही मजूर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मलकापूर येथे उपचार सुरू आहेत.