अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील दरेवाडी येथे बेकायदेशीरपणे बैलगाडा शर्यत आयोजित करणे (bullock cart race) आयोजक तसेच स्पर्धकांना चांगलेच भोवले आहे. कोरोना नियमाचे उल्लंघन तसेच बंदी असतानाही बैलगाडा शर्यत आयोजित केल्याप्रकरणी येथे एकूण 47 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पैकी सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. यामध्ये अहमदनगर तसेच पुणे जिल्ह्यातील काही लोकांचा समावेश आहे. संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. (bullock cart race organised in ahmednagar sangamner corona rules violated police file case against 47 people)
राज्यात बैलडागा शर्यतीचे आयोजन करण्यास बंदी आहे. तसेच राज्यात सध्या कोरोना प्रतिबंधक नियम लागू असल्यामुळे गर्दी जमवण्यास मज्जाव आहे. असे असतानादेखील संगमनेर तालुक्यातील दरेवाडी येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीमध्ये झालेल्या गर्दीचे काही व्हिडीओ नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
या सर्व प्रकाराची दखल घेत घारगाव पोलिसांनी आयोजक तसेच शर्यतीत सहभागी झालेले स्पर्धक आणि प्रेक्षक अशा एकूण 47 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कलम 188, 269, 119 सह प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा कलम 11 (1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. यातील 22 जणांची नावे निष्पन्न झाली आहेत.
पोलिसांनी या कारवाईदरम्यान बोलेरो गाडीसह एक बैलजोडी ताब्यात घेतली आहे. दाखल झालेल्यांपैकी एकूण सहा आरोपींना घारगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बैलाला टोचण्याचा खिळा आणि बांबूची काठीही पोलिसांनी हस्तगत केली आहे. इतर आरोपींचा पोलीसांकडून शोध सुरू आहे.
इतर बातम्या :
(bullock cart race organised in ahmednagar sangamner corona rules violated police file case against 47 people)