अत्यंत गजबजलेल्या असलेल्या मुंबईच्या भेंडीबाजारात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. भेंडीबाजारात एका व्यापाऱ्याने स्वत:वर गोळी घालून जीवन संपवलं आहे. हसमुख असलेल्या या व्यापाऱ्याने अचानक स्वत:ला संपवल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ही घटना घडली तेव्हा त्याच्या कार्यालयात त्याचे कर्मचारी होते. गोळीचा आवाज ऐकताच सर्व धावतच आत गेले. पण त्यावेळी त्यांचा मालक रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.
भेंडीबाजारात काल शुक्रवारी रात्री 8.30च्या सुमारास ही घटना घडली. इक्बाल मोहम्मद सिवानी असं या 52 वर्षीय व्यापाऱ्याचं नाव आहे. भेंडी बाजारातील अमीन बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर त्यांचं कार्यालय आहे. त्यांनी कार्यालयातच स्वत:वर गोळी घातली. त्यावेळी कार्यालयातील कर्मचारीही तिथेच होते. गोळीचा आवाज येताच ते आतमध्ये धावत गेले. तेव्हा सिवानी हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले. पण रुग्णालयात जाईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
म्हणून आयुष्य संपवलं
इक्बाल मोहम्मद हे कर्जाच्या विळख्यात सापडलेले होते. व्यवसायात सतत तोटा होत असल्याने ते तणावाखाली होते. त्यातूनच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात आढळून आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत. सिवानी यांच्या आत्महत्येमागे दुसरा कोणता अँगल तर नाही ना? याचाही तपास पोलीस करत आहेत.
पिस्तुल जप्त
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. तसेच ज्या पिस्तुलमधून गोळी झाडण्यात आली होती, ती जप्त केली आहे. पोलिसांनी एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
गेल्या महिन्यातच एकाने संपवलं
गेल्या महिन्यातही एका श्रीनिवासन नावाच्या व्यक्तीने जीवन संपवलं होतं. श्रीनिवासन बऱ्याच काळापासून विदेशात नोकरी करत होते. नंतर त्यांनी मुंबईत व्यवसाय सुरू केला होता. पण सातत्याने नुकसान होत असल्याने कर्जाला कंटाळून त्यांनी आयुष्य संपवलं होतं. त्यांनी अटल सेतूवरून समुद्रात उडी मारून जगाचा निरोप घेतला होता.