नवी दिल्ली | 17 ऑगस्ट 2023 : रेल्वेच्या तिकीट एजंटने रेल्वेची आयआरसीटीसीची ( IRCTC ) वेबसाईटची सुरक्षा भेदत सॉफ्टवेअरच्या मदतीने 30 लाख रुपयांचा रेल्वे तिकीटांचा घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात रेल्वे सुरक्षा बलाने 47 वर्षीय आरोपीला अटक करीत हा घोटाळा उघडकीस आणला आहे. विशेष म्हणजे आरोपी हा चांगला सुशिक्षित असून त्याने गणितात बीएसस्सी केले आहे. आयआरसीटीसीच्या वेबसाईटमध्ये शिरकाव करून अनेकदा सॉफ्टवेअरचा वापर करीत घोटाळे केले जात आहेत.
रेल्वेची तिकीट यंत्रणा सांभाळणारी आयआरसीटीसी ही वेबसाईट हॅक करुन तिकीटांची अनधिकृतरित्या खरेदी करुन त्याची दामदुप्पट भावाने विक्री केली जात होती. त्यामुळे सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना वेटींगची तिकीटे हाती पडत होती. आयआरसीटीसीच्या वेबसाईटला हॅक करणारा आरोपीचे नाव मोईनुद्दीन चिश्ती असून तो उत्तर प्रदेशातील दादरीचा निवासी आहे. त्याचे ग्रेटर नोएडातील अयोध्या गंजमध्ये रेल्वे तिकीट बुकींगचे ट्रव्हल एजन्सी आहे.
आयआरसीटीसीच्या पोर्टलवर बोगस नावाने युजर आयडी बनवून तिकीटे एकगट्टा बुक करण्यासाठी आरोपीने नेक्सस, सिक्का वी 2 आणि बिगबॉस सारख्या सॉफ्टवेअरचा वापर केला. या सॉफ्टवेअरमुळे व्हीआयपी कोटा आणि तत्काळ तिकीटांना वेगाने बुक केले जाते. सॉफ्टवेअरमुळे सामान्य प्रवाशाच्या तुलनेत वेगाने प्रवाशांची माहीती भरुन तिकीट बुक करता येते. आयआरसीटीसी एजंटा कोणत्याही थर्ड पार्टी सॉफ्टवेअरचा वापर करण्यास मनाई आहे. परंतू त्याने एजंट खात्याच्या गैरवापर करीत आयआरसीटीसीची फसवणूक केली. आयपी एड्रेस शोधून रेल्वे पोलिसांनी या एजंटला अटक केली.
पोलिसांना आरोपीकडे येत्या दिवसात प्रवास सुरु होणारी 88 ई – तिकीटे सापडली आहेत. त्याची किंमत 1.55 लाख रुपये आहेत. त्याने अशाप्रकारे दोन वर्षांत 30 लाख रुपयांची तिकीटे विकली आहेत. आरोपी सुशिक्षित असून त्याने गणितात बीएसस्सी केले आहे. स्थानिक सायबर क्राईम सेलच्या मदतीने रेल्वे सुरक्षा बलाने आरोपी मोईनुद्दीन चिश्तीला अटक केली आहे.