कर्जत जवळ कार ब्रिजवरून रेल्वे ट्रॅकवर कोसळून अपघात, तिघांचा मृत्यू, 2 जखमी

| Updated on: Nov 07, 2023 | 12:02 PM

किरवली ब्रिज वरून इनोव्हा कार खाली पडून झालेल्या दुर्दैवी अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

कर्जत जवळ कार ब्रिजवरून रेल्वे ट्रॅकवर कोसळून अपघात, तिघांचा मृत्यू, 2 जखमी
Image Credit source: TV9 Network
Follow us on

कर्जत | 7 नोव्हेंबर 2023 : राज्यातील दुर्घटनांचे सत्र गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यातच आता आणखी एका अपघाताची भयानक बातमी समोर आली आहे. कर्जत-नेरळ मार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. कर्जत किरवली ब्रिज वरून इनोव्हा कार रेल्वे ट्रॅकवर थेट खाली कोसळली. त्याचवेळी समोरून येणाऱ्या मालगाडीची कारला धडक बसली. ही धडक एवढी भीषण होती की कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला.
तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या दुर्दैवी घटनेत जखमी झालेल्या दोघांवर सध्या एम जी एम रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कार ही कर्जत येथून नेरळच्या दिशेने जात होती. त्यावेळी कारमध्ये पाच ते सहा प्रवासी होते. मात्र ही कार कर्जत ते नेरळच्या दरम्यान असलेल्या किरवली पुलावर आल्यावर कारचालकाचे कारवरील नियंत्रण अचानक सुटले. आणि ही कार क्षणार्धात धाडकन ब्रिजवरून खाली असलेल्या पनवेल कर्जत रेल्वे मार्गावर कोसळली. मात्र त्याच वेळी तेथून एक मालगाडी जात होती. त्या मालगाडीची कारला जोरात धडक बसली आणि भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला झाला, कारचेही मोठे नुकसान झाले.

या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि आजूबाजूच्या लोकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. अपघातातील दोन जखमींना तातडीने उपचारांसाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या भीषण अपघातामुळे एकच खळबळ उडाली आहे.