मुंबई / गोविंद ठाकूर (प्रतिनिधी) : मुंबईत मागील काही दिवसांपासून चोरी आणि खुणांच्या गुन्ह्यामध्ये वाढ झाली आहे. मुंबईच्या जोगेश्वरी पूर्व परिसरातील एका वृद्ध दाम्पत्यावर त्यांच्याच घरात काम करणाऱ्या केअरटेकरने चोरीच्या उद्देशाने धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात वृद्ध मालकाचा जागीच मृत्यू झाला. वृद्ध मालकीन गंभीर जखमी असून, तिला जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच मेघवाडी पोलिसांनी त्याला दादर रेल्वे स्थानकातून ताब्यात घेऊन अटक केली आहे. पप्पू जालिंदर गवळी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सुधीर चिपळूणकर असे मयत वृद्ध मालकाचे नाव आहे, तर सुप्रिया चिपळूणकर असे जखमी वृद्ध मालकीनीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी पूर्वेकडील श्री स्वामी समर्थ इमारतीमधील चिपळूणकर कुटुंबीयांच्या घरातून भांडी जोरजोरात फेकली जात असल्याचा आवाज आला. यानंतर शेजाऱ्यांनी बेल वाजवली असता त्या घरातील केअरटेकर पळून गेला.
समोरील दृश्य पाहून शेजाऱ्यांच्याही अंगाचा थरकाप उडाला. केअरटेकरने केलेल्या हल्ल्यात त्या घरातील सुधीर चिपळूणकर या वृद्ध मालकाचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पत्नी सुप्रिया चिपळूणकर या गंभीर जखमी झाल्या होत्या. या संदर्भात मेघवाडी पोलिसांना फिर्याद मिळाली होती.
मेघवाडी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संबंधित हत्या ही त्या घरातील केअरटेकरनेच केली असल्याचं निष्पन्न झालं. यानंतर तपासासाठी पोलीस पथक पाठवले.
केअरटेकर सिद्धेश्वर एक्सप्रेसने पळून जाण्याच्या तयारीत असतानाच मेघवाडी पोलिसांनी दादर रेल्वे स्थानकातून त्याच्या मुसक्या आवळल्या. आरोपीची चौकशी केली असता चोरीच्या उद्देशाने त्याने ही हत्या केल्याची कबुली दिली.
आरोपी विरोधात मेघवाडी पोलीस ठाण्यात कलम 302, 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.