नाशिक : नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील गडगडसांगवी येथील रेशन दुकानातील धान्य विक्रीबाबत कारवाई करण्यात आली होती. यामध्ये आरोपींना रंगेहाथ पकडल्याची माहिती समोर आली होती. पण आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. याच प्रकरणी आता तत्कालीन पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये मनसेच्या बड्या नेत्याचा देखील सहभाग असल्याने राजकीय वर्तुळात देखील खळबळ उडाली आहे. नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यात हा सर्व प्रकार घडला असून पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही कारवाई न केल्याने संबंधित तक्रारदार यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. खोटे गुन्हे दाखल करणे, जातिवाचक शिवीगाळ करणे आणि मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असला तरी आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. तक्रारदाराने तत्कालीन पोलीस अधिक्षक सचिन पाटील, पोलीस निरीक्षक अनिल पवार, पोलीस कर्मचारी प्रभाकर खांदवे, तहसीलदार परमेश्वर कासुळे, पुरवठा निरीक्षक भरत भावसार, पुरवठा अधिकारी बी. आर. ढोणे आणि मनसे पदाधिकारी असलेले डॉ. प्रदीप पवार यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत.
तक्रारदार गोपाळ लहांगे यांनी जमिनीच्या वादाप्रसंगी मदत केली म्हणून संशयित आरोपींनी जातीवरुन शिवीगाळ करणे, मारहाण करणे, खोटे गुन्हे दाखल केले असे आरोप केले होते.
पोलीस ठाण्यात सुरुवातीला तक्रार देऊनही गुन्हा दाखल न केल्याने लहांगे यांनी न्यायलयात धाव घेतली होती, त्यावरून न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
जमिनीच्या वादात मदत केली म्हणून तत्कालीन पोलीस अधिक्षक आणि मनसे नेते प्रदीप पवार यांनी वचपा काढण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीने माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून मारहाण करत जातीवरून शिवीगाळ केल्याचे तक्रारदार यांचे म्हणणे आहे.
ऑगस्ट महिन्यात घडलेल्या घटणेप्रकरणी 29 नोव्हेंबरला हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये अॅट्रोसिटीचाही गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्याची मागणी केली जात आहे.
तक्रारदार यांनी आरोपींना अटक केली नाही तर उपोषणाला बसेल, आणि उपोषण करूनही कारवाई केली नाही तर आत्मदहन करेल असा इशारा देखील दिला असून पोलीसांच्या कारवाईकडे लक्ष लागलेले आहे.