सांगली शहरातील नामांकित अशा उषःकाल हॉस्पिटल प्रशासनाला 25 लाखाची खंडणी मागणाऱ्या सांगलीतील शाहा कुटुंबियांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचबरोबर रुग्णालयातून रुग्णही परस्पर पळविल्याची तक्रारही रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झालेल्यामध्ये राहुल शाह, संपदा शाह आणि यश शाह यांचा समावेश आहे. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. सांगली पोलीस या प्रकरणी आता सखोल तपास करत आहेत. पण संबंधित प्रकार समोर आल्यानंतर शहरातील नागरिकांमध्ये या प्रकरणावर जोरदार चर्चा सुरु आहे.
राहुल शहा यांच्या मातोश्री शकुंतला शाह या उषःकाल रुग्णालयात उपचार घेत होत्या. त्यांचे रुग्णालयाचे बिल 39,346 रुपये इतके झाले होते. यावेळी राहुल शाह यांनी आपल्या मातोश्री यांना बिल न भरताच रुग्णालयातून नेले. यानंतर शाह यांनीच पोलिसात रुग्णालयाबाबत तक्रार दिली. संबंधित तक्रार मागे घेण्यासाठी संशयितांनी रुग्णालय व्यवस्थापनाकडे 25 लाखांची खंडणी मागितली, असा आरोप करण्यात आलाय. तशी तक्रार रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय कोगरेकर यांनी दिल्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी राहुल शाह याच्यासह तिघांवर गुन्हा दाखल केल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय कोगरेकर यांनी सांगितले.
संबंधित प्रकरणी आता पोलीस तपासातून काय माहिती समोर येतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रुग्णालय प्रशासनाकडे खरंच 25 लाखांची खंडणी मागण्यात आली का? याचा तपास पोलीस करणार आहेत. तसेच रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आलेले आरोप खरे आहेत का? याचा देखील तपास आता पोलिसांकडून करण्यात येणार आहे.