नवी दिल्ली / संदीप राजगोळकर : बिहारच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. राज्याच्या राजकीय क्षेत्रात मोठे प्रस्थ असलेले लालूप्रसाद यादव आणि त्यांचे कुटुंबीय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. राजदचे नेते लालूप्रसाद यांच्या पत्नी तथा बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या घरावर सीबीआयच्या पथकाने छापेमारी केली आहे. लालूप्रसाद यांचे चिरंजीव तेजस्वी यादव हे विधानसभेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी गेले होते, त्याचदरम्यान सीबीआयचे पथक राबडी देवी यांच्या घरी धडकले. जमिनीच्या बदल्यात रेल्वे खात्यात नोकरी दिल्याच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयने ही कारवाई केल्याचे समजते.
रेल्वे खात्यातील घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या आहेत. आज सीबीआयने मोठी कारवाई करत पाटणा येथील राबडी देवी यांच्या निवासस्थानावर छापा टाकला. या केंद्रीय तपास यंत्रणेने अलीकडेच लालूप्रसाद, राबडी देवी, मिसा भारती यांच्यासह 14 जणांना समन्स पाठवले आहे.
त्यानुसार या तिघांना येत्या 15 मार्चला सीबीआयपुढे हजर राहावे लागणार आहे. 14 वर्षे जुन्या प्रकरणात लालूयादव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी जमिनीच्या बदल्यात 7 जणांना रेल्वेत नोकरी देऊन घोटाळा केल्याचा आरोप आहे. त्यापैकी 2 भूखंड लालूंना भेट म्हणून देण्यात आले होते.
लालूप्रसाद यादव अलीकडेच सिंगापूरमधून किडनी प्रत्यारोपण करून मायदेशी परतले आहेत. याचदरम्यान सोमवारी सीबीआयची तीन पथके राबडी देवी यांच्या घरी दाखल झाली आणि छापेमारी सुरु करण्यात आली. तपास अधिकाऱ्यांकडून राबडी देवी यांच्या घरातील महत्त्वाची कागदपत्रे, मोबाईल फोन ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली जात आहे.
कथित घोटाळा प्रकरणात सीबीआयने आरोपपत्रही दाखल केले आहे. त्यात लालूप्रसाद यांचे निकटवर्तीय आणि माजी आमदार भोला यादव, हृदयानंद चौधरी यांचाही आरोपी म्हणून समावेश आहे. भोला यादव यांना सीबीआयने 27 जुलै रोजी अटक केली होती. भोला हे 2004 ते 2009 या कालावधीत तत्कालीन रेल्वे मंत्री लालूप्रसाद यांचे ओएसडी होते. या प्रकरणात अनेक जण चौकशीच्या भोवऱ्यात सापडले आहेत.