निलेश डाहाट , टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, चंद्रपुर | 9 डिसेंबर 2023 : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. तेथील टेमुर्डा येथील एक बँक लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. चोरट्यांनी बँकेची भिंत फोडण्यातही यश मिळवले होते. मात्र अचानक बँकेच्या बाजूच्या घरातील कुत्री जोरजोरात भूंकू लागल्याने आजूबाजूचे नागरिक जागे होऊन सावध झाले. आणि चोरट्यांना चोरी अर्धवट सोडून तसाच पळ काढावा लागला. धक्कादायक गोष्ट म्हणजे नागपूर महामार्गालगत असलेली ही बँक गेल्या 15 वर्षात 7 वेळा फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला आहे. कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे आत्ता हे चोरटे पळाले असले तरीही यामुळे गावात मोठी खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलीसांनी घटनास्थळ गाठून माहिती मिळवत अधिक तपास सुरू केला आहे.
बँकेची भिंत फोडण्यात मिळालं यश, पण तेवढ्यात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातल्या टेमुर्डा गावातील बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा फोडण्याचा प्रयत्न चोरांनी केला. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 15 वर्षात तब्बल 7 वेळा फोडण्यात ही बँक फोडली गेली आहे. यातील काही प्रयत्न यशस्वी झाले तर काही अपयशी ठरले. बँक ऑफ महाराष्ट्रची ही शाखा नागपूर-चंद्रपूर महामार्गाच्या अगदी शेजारी आहे.
काल मध्यरात्री 12 ते 12.30 च्या दरम्यान बँकेला लागून असलेल्या ग्रामपंचायतची खिडकी तोडून काही चोरांनी बँकेत शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र शेजारीच असलेल्या रमेश ठवरी यांच्या घरातील कुत्री जोरजोरात भुंकायला लागल्यामुळे सगळे जण जागे झाले. बँकेत चोर घुसल्याचे समजताच काहींनी लगेच पोलिसांना या घटनेची माहिती दिली. तर उर्वरित सजग नागरिकांनी लगेचच चोरट्यांना पकडण्यासाठी बँकेत धाव घेतली.
माग लागू नये म्हणून चोरट्यांनी पळवले सीसीटीव्ही
आजूबाजूचे नागरिक पकडायला येत असल्याचे दिसताच चोरट्यांनी तिथून लागलीच धूम ठोकली. मात्र त्यातही त्यांनी चलाखी दाखवलीच. पोलिसांना आपला माग काढता येऊ नये म्हणून चोरट्यांनी ग्रामपंचायतीच्या ज्या कार्यालयातून बँकेत घुसण्याचा प्रयत्न केला होता, तेथे लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि DVR हेच पळवून नेले. याप्रकरणी वरोरा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत. मात्र 15 वर्षात तब्बल 7 ही बँक फोडण्याचा, लुटण्याचा प्रयत्न झाल्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असून सध्या गावात, आजूबाजूला सर्वत्र या चोरीचीच चर्चा सुरू आहे.