निलेश दहात, चंद्रपूरः कालच्या प्रजासत्ताक दिनाला (Republic day) राज्यभरातील शाळांमधून ध्वजारोहणासहित कार्यक्रम घेण्यात आले. देशाच्या राष्ट्रध्वजाला सलामी देण्यासाठी विद्यार्थी मोठ्या तयारीने या दिवशी शाळेत जातात. चंद्रपुरातही (Chadrapur) असंच वातावरण होतं. एका शाळेतले 3 मित्र ध्वजारोहणाला (Flag hosting) मोठ्या उत्साहात उपस्थित राहिले. पण कालची तिरंग्याला त्यांनी दिलेली सलामी अखेरची ठरली. ध्वजारोहणानंतर शाळेला मिळालेल्या सुटीचा आनंद लुटण्यासाठी तिघे तलावावर गेले. पोहण्याची मजा घ्यायची म्हणून तलावात उतरले अन् पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं तिघेही बुड्याल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
चंद्रपुरात अल्ट्राटेक कंपनीच्या परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. काल दुपारपासून मुले घरी न परतल्यामुळे पालकांनी शोधाशोध सुरु केली. अखेर रात्री कंपनीच्या परिसरातील तलावाजवळ मुलांचे कपडे, चपल्यांचे जोड सापडले. नातेवाईकांच्या पोटात गोळाच आल्याची स्थिती होती. कशी बशी रात्र काढली. सकाळपासून बचावकार्य सुरु झालं… अन् जे घडायला नको होतं तेच घडल्याचं समोर आलं.
अग्निशमक दलाच्या जवानांना या तिन्ही मुलांचे मृतदेह आढळले. तलावातील गाळात फसल्याने या तिन्ही मुलांना प्राण वाचवता आले नाहीत, असा अंदाज वर्तवण्यात येतोय.
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात आवारपूर येथे अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आहे. या परिसरात राहणाऱ्या तीन मुलांबाबत ही दुर्दैवी घटना घडली.
ही तिन्ही मुलं दहा वर्षाची होती. एकाच वर्गात शिकत होती. काल सुट्टी असल्याने सिमेंट कंपनीच्या कॉलनीत राहणारी ही मुलं खेळायला बाहेर पडली. मात्र रात्री उशिरा पर्यंत घरी न आल्याने शोधाशोध सुरू झाली. रात्री कंपनीच्या परिसरात असलेल्या तलावाजवळ मिळाले मुलांचे कपडे आणि जोडे-चपला आढळल्या.
या घटनेत मृत झालेल्या मुलांची नाव पारस गोवारदीपे, अर्जुन सिंह आणि दर्शन बसेशंकर अशी आहेत. तलावात असलेल्या गाळामध्ये पाय फसल्याने मुलं बुडाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय. प्रजासत्ताक दिनाच्या सुटीचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या तिघांवर काळाने अशाप्रकारे घाला घातल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.