नवी दिल्ली : पेहलवान सागर धनखड हत्या प्रकरणी (Wrestler Sagar Dhankhad murder case) रेसलर सुशील कुमारसह 17 जणांवर आरोपपत्र दाखल (Chargesheet Filed) करण्यात आले आहेत. तर दोन आरोपी फरार असून त्यांच्याविरोधातही आरोपपत्र दाखल करण्यात आले. दिल्लीतील रोहिणी न्यायालयात (Rohini Court Delhi) सागर धनखड हत्या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने सर्व आरोपींविरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न, दंगल, बेकायदेशीर सभा आणि गुन्हेगारी कट आदी गुन्ह्यांतर्गत आरोपींविरोधात खटला चालवला जाईल.
4 मे 2021 रोजी पेहलवान सुशील कुमार आणि त्याच्या साथीदारांनी मिळून सागर धनखडचे अपहरण केले. त्यानंतर त्याला दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये नेण्यात आले. तेथे त्याला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सागरचा मृत्यू झाला.
शवविच्छेदन अहवालात जड वस्तूने सागरवर हल्ला केल्यामुळे त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या. यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. या मारहाणीत सागरच्या शरीरातील हाडेही मोडली होती.
सागरच्या हत्येनंतर पेहलवान सुशील कुमार फरार झाला होता. मात्र दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने त्याला हत्येच्या 17 दिवसांनी अटक केली. सध्या सर्व आरोपी तिहार जेलमध्ये कैद आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्व आरोपींविरोधात सुमारे 170 पानांचे आरोपपत्र आणि 1000 पानांचे एनेक्चर आहे. तर पोलिसांनी या हत्या प्रकरणात 155 साक्षीदार उभे केले. सुशीलकुमारसह 20 जणांना या हत्या प्रकरणात आरोपी करण्यात आले असून, यापैकी दोन जण फरार आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे.