कल्याण / 5 ऑगस्ट 2023 : कल्याण-डोंबिवलीत गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक होण्याचे प्रकारही हल्ली वाढले आहेत. शेअर बाजारात गुंतवणुकीवर 80 टक्के व्याज मिळवून देण्याचे आमिष दाखत 10 कोटी रुपांचा गंडा घातल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. याप्रकरणी एका आरोपीला शिर्डीतून कल्याण बाजारपेठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दर्शन परांजपे असे अटक आरोपीचे नाव आहे. फसवणुकीची रक्कम वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत. आरोपीने आतापर्यंत किती जणांची फसवणूक केली, एकूण किती पैसे उकळले, या पैशांचं काय केलं, याबाबत पोलीस चौकशीनंतरच उघड होईल.
कल्याणमधील पारनाका परिसरात आरोपी दर्शन परांजपे राहतो. अनेकांना शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास त्याच्या बदल्यात 80 टक्के व्याज देतो, असे त्याने सांगितले. त्याच्या आमिषाला बळी पडत कल्याणमधील अनेक लोकांनी त्याच्याकडे गुंतवणूक केली. मात्र, गुंतवणूकदारांना मूळ रक्कम आणि व्याज न मिळालेच नाही. यामुळे त्यांनी परांजपे यांच्याकडे विचारणा केली असता, त्याने शेअर बाजारात गुंतवलेले पैसे बुडाल्याचे सांगितले. मी पैसे कुठून देऊ असे सांगत लोकांची फसवणूक केली.
या प्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात दहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा गुंतवणुकदारांनी दाखल केला होता. या प्रकरणी कल्याणचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दर्शनचा शोध सुरू करण्यात आला. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलीस त्याचा शोध घेत असता आरोपी शिर्डी येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर बाजारपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी अजिंक्य मोरे यांच्यासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक शिर्डीला रवाना झाले. तेथे सापळा रचून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.