फ्लॅट्ससाठी करोडो रुपये भरले, मात्र आता विकासक म्हणतो…, काय आहे प्रकरण?

| Updated on: Apr 29, 2023 | 4:30 PM

प्रत्येक जण आपले घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत होते. हे स्वप्न पूर्ण करताना अनेक अडथळे मार्गात येत असतात. मात्र सर्व अडथळे पार करत जेव्हा व्यक्ती आपले स्वप्न पूर्ण करतो आणि जर कुणी आपलं हे स्वप्नच हिरावून घेतलं तर पायाखालची जमीनच सरकते.

फ्लॅट्ससाठी करोडो रुपये भरले, मात्र आता विकासक म्हणतो..., काय आहे प्रकरण?
घरांचा ताबा देण्यास नकार देणाऱ्या बिल्डरविरोधात तक्रार
Image Credit source: TV9
Follow us on

सुनील जाधव, कल्याण : कल्याणमध्ये बिल्डरच्या फसवणुकीची अनोखी घटना उघडकीस आली आहे. कल्याण जवळच्या कोलीवली आणि टिटवाळ्यातील बल्याणी येथील एका गृहप्रकल्पात फ्लॅट खरेदी करणाऱ्या खरेदीदारांना फ्लॅट्सचा ताबा देण्यास विकासकाने नकार दिला आहे. एक कोटी 75 लाख रुपये किमतीच्या तीन सदनिका खरेदी करणाऱ्या घर खरेदीदारांना घरांचा ताबा देण्यास मयत विकासकाच्या वारसांनी नकार दिला आहे. ज्या विकासकाबरोबर तुमचा व्यवहार झाला होता. त्याच्याबरोबर तुम्ही बघून घ्या, अशी उत्तरे विकासकाचे वारस देत असल्याने घर खरेदीदारांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

अंधेरीतील तिघांना तीन फ्लॅट्स खरेदी केले होते

अंधेरी येथील रहिवासी विद्या मोरे, त्यांचा मुलगा गौरव मोरे आणि भाऊ महेंद्र नाईक या तिघांनी फ्लॅट्स खरेदी केले होते. मात्र विकासकाच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसांनी घराचा ताबा देण्यास नकार दिल्याने घर खरेदीदारांची मोठी फसवणूक झाली आहे. विद्या मोरे यांनी या फसवणूक प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात कल्याणमधील बेतुरकरपाडा येथील मयत विकासक बाळू कान्हू गावडे यांचे वारस हर्षद गावडे, शोभा बाळू गावडे, वृषाली पुनीत घाडगे, वृंदा राजेश पवार, हर्षदा वैभव वरगुडे यांच्याविरुध्द तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.

दोन वर्षापूर्वी विकासकाचा मृत्यू झाला

मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2019 मध्ये तक्रारदार विद्या मोरे आणि तिच्या नातेवाईकांनी विकासक बाळू गावडे यांच्या कोलीवली, टिटवाळा जवळील बल्याणीमधील गृह प्रकल्पात तीन सदनिका खरेदी केल्या होत्या. घर खरेदीसाठी तक्रारदार आणि त्यांच्या नातेवाईकांनी एक कोटी 75 लाख रुपये विकासक बाळू गावडे यांना धनादेशाव्दारे दिले होते. गृह प्रकल्पांची कामे सुरू असताना दोन वर्षापूर्वी विकासक बाळू गावडे यांचे निधन झाले. त्यामुळे घर खरेदीदारांनी त्यांचा मुलगा हर्षद याच्याकडे वडिलांबरोबर केलेल्या कराराप्रमाणे घरांचा ताबा देण्याची मागणी सुरू केली.

वडिलांच्या निधनानंतर वासरदारांटा खरेदीदारांना घरे देण्यास नकार

हर्षद आणि त्याच्या नातेवाईकांनी तुम्ही व्यवहार आमच्या वडिलांबरोबर केले होते. त्याचा आमच्याशी काहीही संबंध नाही, अशी भूमिका घेतली. हा प्रकार ऐकून घर खरेदीदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. घराचा ताबा द्यायचा नसेल तर दिलेले पैसे परत करा, अशी आग्रही मागणी तक्रारदार करू लागले. त्यालाही हर्षद आणि त्यांचे नातेवाईक दाद देत नव्हते. गावडे कुटुंबीयांकडून घरांचा ताबा मिळण्याची आशा मावळल्याने आणि त्यांनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर विद्या मोरे यांनी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.