नवी दिल्ली : डीएचएफएल फसवणूक प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआय (CBI)ला मोठे यश आले आहे. डीएचएफएल (DHFL)शी संबंधित 34 हजार 615 कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणातील आरोपीला सीबीआयने आज अटक (Arrest) केले आहे. अजय रमेश नावंदर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. नावंदर हा दाऊद इब्राहिमचा साथीदार छोटा शकीलचा निकटवर्तीय मानला जातो. सीबीआय लवकरच त्याची चौकशी करू शकते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी 8 जुलै रोजी झालेल्या चौकशीदरम्यान नावंदरची सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते.
सीबीआयने 8 जुलै रोजी नावंदर याच्या ठिकाणांवर छापा टाकला होता. यावेळी, सुमारे 350 दशलक्ष किमतीची मौल्यवान घड्याळे, पेंटिंग्ज आणि रोलेक्स ऑयस्टर, कार्टियर, ओमेगा आणि हब्लॉट मिशेल कोर्से यांसारखी शिल्पे जप्त करण्यात आली. तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, झडतीदरम्यान जप्त करण्यात आलेली मौल्यवान वस्तू डीएचएफएलच्या कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांच्या मालकीची आहेत. सीबीआयने या प्रकरणी दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (DHFL), त्याचे सीएमडी कपिल वाधवान, संचालक धीरज वाधवान आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या अजय रमेशला न्यायालयात हजर करून रिमांड घेण्यात येणार आहे. रिमांडवर चौकशीदरम्यान त्याच्याकडून ही घोटाळ्यातील हा पैसा कोठून कोठे पाठवण्यात आला याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासोबतच घोटाळ्यातील पैशांचा संबंध अंडरवर्ल्डशी आहे का याचाही तपास सीबीआय करत आहे. 22 जून 2022 रोजी सीबीआयने 34 हजार कोटी रुपयांच्या या बँक घोटाळ्याप्रकरणी गुन्हा नोंदवून डझनभरहून अधिक ठिकाणी छापे टाकले होते. (Chhota Shakeels close aide Ajay Navander arrested by CBI in connection with DHFL scam)