नवी दिल्ली : ‘युआन वांग 5’ हे चीनी जहाज (Chinese Ship) श्रीलंकेतील हंबनटोटा बंदरात पोहोचले आहे. भारताच्या आक्षेपानंतर श्रीलंकेने या जहाजाला प्रवेश देण्यास परवानगी नाकारली होती. मात्र नंतर मंजुरी दिली आहे. 16 ते 22 ऑगस्टदरम्यान हंबनटोटो बंदरावर हे जहाज थांबणार आहे. चीनने आम्ही या जहाजाद्वारे हेरगिरी (Espionage) करत नाही, अशी बतावणी श्रीलंकेपुढे केली आहे. चीनचा हा दावा किती खोटा आणि किती खरा, याची शहानिशा करण्याच्या अनुषंगाने चीनच्या दाव्याची चौकशी (Inquiry) करण्यासाठी श्रीलंकेकडे कोणतेही साधन किंवा तंत्रज्ञान नाही. त्यामुळे चीनच्या हेरगिरीचा संशय बळावला आहे. त्या पार्श्वभूमीवर चीनच्या संभाव्य कारनाम्यांचे मनसुबे उधळण्यासाठी भारत सावध पवित्र्यात आहे.
2007 मध्ये चीनच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आलेले हे जहाज चीन ज्या सात जहाजांना ‘संशोधन जहाज’ म्हणतो त्यापैकी एक जहाज आहे. चीनकडे अशी सात जहाजे आहेत. त्यातील हे पाचव्या क्रमांकाचे जहाज असल्यामुळेच या जहाजाचे नाव ‘युआन वांग 5’ असे ठेवण्यात आले आहे. हे जहाज अत्याधुनिक ट्रॅकिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. हे जहाज बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि उपग्रहांचा देखील मागोवा घेऊ शकते. ते जिथे उभे आहे, तिथून तब्बल 750 किमीच्या त्रिज्येत डेटा गोळा करू शकते. हंबनटोटा हे जगातील सर्वात व्यस्त ईस्ट वेस्ट शिपिंग मार्गाच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे चीनच्या हेतूवर संशय येऊ लागला आहे. हंबनटोटावर उभं राहून ते जहाज भारतीय किनाऱ्यापासून 160 किमीपर्यंतच नव्हे तर ते श्रीहरिकोटा येथील इस्रो उपग्रह केंद्र आणि कल्पक्कम न्यूक्लियर प्लांटशी संबंधित महत्वपूर्ण आणि संवेदनशील डेटा देखील गोळा करू शकते. ते कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाचा डेटा कॅप्चर करू शकते. याशिवाय दक्षिण भारतातील 6 नौदल तळांवरही हेरगिरी करू शकते. चीन हे हेरगिरी जहाज मानण्यास नकार देत असला तरी समुद्राच्या तळाच्या मॅपिंगद्वारे ते भेदक नौदल संरक्षण चिलखताशी संबंधित डेटा गोळा करू शकते, असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
भारताच्या आक्षेपानंतरही श्रीलंकेने चीनचे हेरगिरी जहाज येऊ दिले, यामागे श्रीलंकेची मजबुरी असल्याचे बोलले जात आहे. वास्तविक हंबनटोटा बंदर चीनने विकसित केले आहे, ते 99 वर्षांच्या भाडेतत्त्वावर आहे. श्रीलंकेने नकार दिला असता तर चीन आपली किंमत वसूल करू शकला असता. सध्या आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेसाठी चीनचे ते पाऊल महागडे ठरू शकते. याचवेळी श्रीलंकेला भारताने तेलापासून सर्व प्रकारची मदत केली आहे. तसेच भारताने यावर्षी 3.8 अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले आहे. त्यामुळे श्रीलंकेची दुहेरी कोंडी झाल्याचे चित्र आहे. (Chinese spy ship reaches Sri Lankas Hambantota port, India on alert)