भाईंदर : नामांकित सरकारी संस्थांमध्ये नोकरी लावण्याच्या नावाखाली नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना भाईंदरमध्ये घडली आहे. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अजितकुमार डे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अजितकुमार विरोधात उत्तन सागरी पोलीस ठाणे आणि नवघर पोलीस ठाण्यात कलम 420 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोकरीच्या नावाखाली घेण्यात आलेली रक्कम लाखांमध्ये असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
अजितकुमार डे हा लोकांना भेटून त्यांना नामांकित सरकारी संस्थांमध्ये जलविभाग येथे लॅबॉट्री सीनियर टेक्निशियन, रेल्वे तिकीट क्लर्क, दिल्ली येथे DRDO मध्ये नोकरी, पर्सनल सेक्रेटरी, रेल्वे टीसी म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष द्यायचा. नोकरी लावण्यासाठी लोकांकडून लाखो रुपये घेत त्यांची सरकारी नोकरीच्या नावाखाली फसवणूक करत होता. पैसे देऊन देखील नोकरीचे काम होत नसल्याने डे याच्यावर संशय आला. त्याच्या विरोधात उत्तन आणि नवघर पोलीस ठाण्यात सरकारी नोकरी देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रार दाखल झाल्यानंतर त्याला उत्तन पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्यावर अगोदर गुजरात, औरंगाबादमध्ये देखील फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. लोकांनी सरकारी नोकरी देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांपासून सावधान रहावे. सरकारी नोकर भरती पारदर्शक रित्या करण्यात येते. त्यामुळे कोणाचीही फसवणूक केली जात असल्यास त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार द्यावी, असे आवाहन परिमंडळ 1 चे उपायुक्त जयंत बजबळे यांनी केले आहे.