यवतमाळ : जुन्या वादातून दोन कुटुंबात झालेल्या फ्री स्टाईल हाणामारीत 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. यवतमाळच्या देऊरवाडी बुटले येथे रात्रीच्या दरम्यान दोन गटात राडा झाला. जखमींमध्ये महिलांचाही समावेश आहे. याप्रकरणी आर्णी पोलीस ठाण्यात माघाडे कुटुंबातील चौघांविरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गोपाळ मोतिराम माघाडे, संतोष मोतिराम माघाडे, गणेश मोतिराम माघाडे आणि राहुल मोतिराम माघाडे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आर्णी पोलीस पुढील तपास करत आहेत.
आर्णी तालुक्यातील देवूरवाडी (बु)येथे शुक्रवारी सायंकाळी इंगळे आणि माघाडे या दोन गटात जुन्या वादातून लाठ्या काठ्यांनी मारहाण झाली. यात माघाडे कुटुंबातील चौघा भावांनी शेजारी राहणार्या इंगळे कुटुंबाच्या घरात घुसून महिला आणि पुरूषांना मारहाण केली.
आरोपींनी संगनमत करुन घरात घुसून जीवे मारण्याच्या उद्देशाने इंगळे कुटुंबातील महिला आणि पुरुषांना मारहाण केली. यात इंगळे कुटुंबातील आठ जण जखमी झाले, तर माघाडे चार जण जखमी झाले.
मारहाणीची घटना कळताच गावकऱ्यांनी धाव घेत जखमींना तात्काळ आर्णी ग्रामिण रुग्णालयात नेले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने जखमींना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे रवाना करण्यात आले.
याप्रकरणी रात्री उशिरा फिर्यादी हिंमत सखारम इंगळे यांनी आर्णी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. फिर्यादीवरुन आरोपी गोपाळ मोतीराम माघाडे, संतोष मोतीराम माघाडे, गणेश मोतीराम माघाडे, राहुल मोतीराम माघाडे यांच्यावर राञी उशिरा गुन्हे दाखल करण्यात आले.