महिलेकडे बघितल्याच्या संशयातून फ्री स्टाईल हाणामारी, भररस्त्यात दोन गट एकमेकांना भिडले !

| Updated on: Apr 19, 2023 | 5:38 PM

एक महिला हॉटेलमध्ये जेवायला आली होती. यावेळी तिला हॉटेलबाहेर बसलेले काही तरुण आपल्याकडे बघून काहीतरी बोलत आहेत असे वाटले. यानंतर जे घडले ते भयंकर होते.

महिलेकडे बघितल्याच्या संशयातून फ्री स्टाईल हाणामारी, भररस्त्यात दोन गट एकमेकांना भिडले !
क्षुल्लक कारणातून दोन गटात हाणामारी
Image Credit source: TV9
Follow us on

कल्याण / सुनील जाधव : कल्याणमधील आंबिवलीत हाणामारीची घटना उघडकीस आली आहे. एका महिलेवरुन हा राडा झाला असून, याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील 10 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत. काही तरुण आपल्याकडे बघून बोलत असल्याचा संशय महिलेला आला आणि यातूनच पुढे हा वाद झाला. हा वाद नंतर विकोपाला गेला आणि भररस्त्यात राडा झाला.

महिलेकडे बघितल्यावरुन वादाला सुरुवात

कल्याण आंबिवली परिसरातील इराणी वस्तीतील एक महिला गावातील एका हॉटेलमध्ये जेवायला आली होती. यावेळी हॉटेलबाहेर असलेले काही तरुण आपल्याकडेच बघून काहीतरी बोलत आहेत, असा संशय महिलेला आला. तिने याबाबत आपल्या पतीला आणि कुटुंबीयांना माहिती दिली. यानंतर पतीची तरुणांसोबत बाचाबाची झाली. यानंतर प्रकरण खडकपाडा पोलीस ठाण्यात गेलं. पोलिसात महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर सर्वजण आपापल्या घरी निघून गेले.

दोन गट आपसात भिडले

यानंतर संध्याकाळी इराणी वस्तीतील एक गट गावात आला आणि सदर तरुणांना जाब विचारु लागला. यानंतर गावातील एक गट आणि इराणी वस्तीतील एक गट यांच्यात जोरदार हाणामारी सुरु झाली. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर पोलिसांनी व्हिडिओची दखल घेत चौकशी सुरु केली. मात्र कुणीही तक्रार द्यायला तयार नव्हते. अखेर पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे दोन्ही गटातील 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केला.

हे सुद्धा वाचा

सध्या याप्रकरणी कल्याण झोन 3 चे डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी उमेश माने पाटील, खडकपाडा पोलीस ठाण्याचे सीनियर पीआय सर्जेराव पाटील आणि क्राईम पीआय शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली तीन विविध टीम या प्रकरणाचा तपास करत आहेत.