भिंड : कोरोना महामारीनंतर विविध व्याधींनी डोके वर काढले आहे. अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्धांपर्यंत बहुतांश लोक कुठल्या ना कुठल्या आजाराने बेजार झाले आहेत. नागरिकांमध्ये हृदयविकाराची झटके येण्याचे प्रमाणही वाढले आहे. याचदरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या 12 वर्षांच्या लहान मुलाला हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन प्राण गमवावा लागला. बसमध्ये या मुलाला अचानक चक्कर येऊन तो खाली पडला आणि अवघ्या काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.
एवढ्या कमी वयामध्ये हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
12 वर्षांच्या शाळकरी मुलाला स्कूल बसमधून घरी परतत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. मध्यप्रदेश राज्यातील भिंड परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. हा मुलगा चौथी इयत्तेमध्ये शिकत होता, तसेच त्याला कुठल्याही प्रकारची व्याधी नव्हती.
अशा प्रकारे कुठल्याही वैद्यकीय गुंतागुंतीशिवाय मुलाला प्राण गमवावा लागल्याची घटना घडल्याने डॉक्टरही चक्रावून गेले आहेत. डॉक्टरांनी लहान मुलांमध्ये अशाप्रकारे गंभीर आजार होऊ लागल्यामुळे चिंता व्यक्त केली आहे. मनिष जाटव असे मृत्यू झालेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे.
मनिष नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी शाळेत गेला. शाळा सुटल्यानंतर स्कूलबसने तो घरी परतत होता. स्कूल बसमध्ये असतानाच त्याला अचानक चक्कर आली आणि तो सीटजवळच खाली पडला.
स्कूलबस चालकाने याची माहिती शाळा व्यवस्थापनाला दिली. त्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. सुरुवातीला त्याला उकाड्याचा त्रास झाला असावा, असा संशय वाटू लागला होता. मात्र नंतर त्याला हृदयविकाराचा गंभीर झटका आल्याचे समजताच सर्वांनाच मोठा धक्का बसला.
मनिषला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र दुर्दैवाने उपचाराआधीच त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे मनिषच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.