मुंबई : हल्लीची पिढी सोशल मीडियावर अधिक सक्रिय असते. पण सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहण्याच्या नादात मुलं काय करतील याचा नेम नाही. अशीच एक घटना उघडकीस आली आहे. एका बारावीच्या विद्यार्थ्याने चक्क विमान पडणार असल्याचे ट्विट केले. मग एकच खळबळ उडाली. यानंतर विमान कंपनीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सदर विद्यार्थ्याला अटक केले. मात्र त्याची परीक्षा सुरु असल्याने त्याला जामिनावर सोडण्यात आले. ट्विट करणे विद्यार्थ्याला चांगलेच महागात पडले आहे. यामुळे ट्विट करताना तुम्हीही काळजी घ्या, अन्यथा एक ट्विट तुम्हालाही पोलीस ठाण्यापर्यंत घेऊन जाईल.
विद्यार्थ्याने ट्विट करत म्हटले होते की, “आकासा एअर बोईंग 737 मॅक्स (विमान) क्रॅश होईल.” या ट्विटनंतर आकासा एअरलाइनने मुंबई पोलिसात विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या ट्विट संदर्भात तपास सुरू केला असता, हे ट्विट गुजरातमधील एका बारावीच्या विद्यार्थ्याने केल्याचे आढळून आले.
यानंतर मुंबई पोलिसांनी गुजरात गाठून 27 मार्चला विद्यार्थ्याला अटक केली. विद्यार्थ्याची चौकशी केली असता त्याने सांगितले की, आपल्याला विमानांबद्दल जाणून घेण्यात रस आहे आणि सोशल मीडियावर अशा पोस्टचे परिणाम काय आहेत याची आपल्याला माहिती नव्हती. गोंधळ निर्माण करण्याचा आपला हेतू नव्हता. यानंतर पोलिसांनी विद्यार्थ्याला एक दिवस ताब्यात ठेवल्यानंतर परीक्षा असल्याने पाच हजार रुपये जामिनावर त्याची सुटका केली.