बुलढाणा : भाजपा नेते चैनसुख संचेती यांच्या शिक्षण संस्थेतील लिपिकास एक लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत विभागाने अटक केली आहे. अनुकंपा तत्वावर नेमणुकीसाठी मान्यता मिळवून देण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी केली होती. बस स्थानक परिसरात तक्रारदराकडून एक लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केलं. विलास सोनुने असे अटक लिपिकाचे नाव असून, मलकापूर येथील गोविंद विष्णु महाजन महाविद्यालयात कार्यरत आहे.
मलकापूर येथील भाजपाचे वरिष्ठ नेते तथा माजी आमदार चैनसुख संचेती अध्यक्ष असलेल्या, मलकापूर शिक्षण समीतीच्या गोविंद विष्णु महाजन विद्यालयात ही घटना उघडकीस आली आहे. अनुकंपा तत्वावर नेमणुकीसाठी मान्यता मिळवून देण्यासाठी, एक लाख रुपयांची लाच स्विकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून अटक केली आहे. काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मलकापूर बस स्थानक परिसरातील रसवंतीमध्ये ही कारवाई केली आहे.
मलकापूर येथील एका तक्रारदाऱ्याच्या भावाचा अनुकंपा तत्त्वावरील नेमणुकीबाबत मान्यतेचा प्रस्ताव माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे या संस्थेमार्फत सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावास मान्यता मिळवून देण्यासाठी या संस्थेच्या गोविंद विष्णु महाजन विद्यालयातील वरिष्ठ लिपिक विलास सोनुने यांनी तक्रारदाराकडे माध्यमिक शिक्षणाधिकारी बुलडाणा कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी 2 लाख रुपयांची लाच मागितली होती.
दरम्यान, याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने प्रथम लाच मागितल्याची पंचासमक्ष पडताळणी केली. त्यानंतर सापळा रचून आरोपी लिपिक विलास सोनुने यास तक्रारदाराकडून एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना पंचासमक्ष रंगेहाथ पकडले. याप्रकरणी मलकापूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.