Ratnagiri Girls Attack : जमिनीच्या वादातून महाविद्यालयीन तरुणींवर हल्ला, एकीचा मृत्यू तर दुसरी जखमी

| Updated on: Jan 18, 2023 | 7:43 PM

भालावली सिनियर कॉलेजमध्ये धारतळे येथे साक्षी गुरव आणि सिद्धी गुरव या दोघी मैत्रिणी शिक्षण घेतात. दोघीही एकाच गावातील रहिवासी आहेत. नेहमीप्रमाणे आज दुपारी 12 वाजता कॉलेज संपल्यानंतर साक्षी आणि सिद्धी घरी चालल्या होत्या.

Ratnagiri Girls Attack : जमिनीच्या वादातून महाविद्यालयीन तरुणींवर हल्ला, एकीचा मृत्यू तर दुसरी जखमी
जमिनीच्या वादातून महाविद्यालयीन तरुणींवर हल्ला
Image Credit source: TV9
Follow us on

रत्नागिरी : भावकीतील जमिनीच्या वादातून महाविद्यालयीन तरुणीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना राजापूर तालुक्यातील भालावली येथे घडली आहे. यावेळी मैत्रिणीला वाचवायला मध्ये पडलेल्या तरुणीवरही आरोपीने हल्ला केला. या हल्ल्यात सदर तरुणीचा मृत्यू झाला. तर दुसरी गंभीर जखमी असून, तिला उपचारासाठी रत्नागिरी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. साक्षी मुकुंद गुरव असे मयत झालेल्या 20 वर्षीय तरुणीचे नाव आहे. सिद्धी संजय गुरव असे 21 वर्षीय जखमी तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी नाटे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. विनायक गुरव असे हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

दुपारी कॉलेज सुटल्यानंतर घरी चालल्या होत्या दोघी

भालावली सिनियर कॉलेजमध्ये धारतळे येथे साक्षी गुरव आणि सिद्धी गुरव या दोघी मैत्रिणी शिक्षण घेतात. दोघीही एकाच गावातील रहिवासी आहेत. नेहमीप्रमाणे आज दुपारी 12 वाजता कॉलेज संपल्यानंतर साक्षी आणि सिद्धी घरी चालल्या होत्या.

वाटेत दबा धरुन बसलेल्या आरोपीने प्राणघातक हल्ला केला

कॉलेजमधून घरी जात असतानाच वाटेत दबा धरुन बसलेल्या विनायक गुरव याने सिद्धी गुरव या तरुणीवर हल्ला केला. यावेळी साक्षी मैत्रिणीला वाचवण्यासाठी मध्ये पडली असता आरोपीने तिच्यावकडे आपला मोर्चा वळवला.

हे सुद्धा वाचा

आरोपीने सिद्धीला सोडून साक्षीवर हल्ला करण्यास सुरवात केली. या हल्ल्यात साक्षीचा जागीच मृत्यू झाला. तर सिद्धी गंभीर जखमी झाली आहे. घटनेनंतर आरोपी तेथून पळून गेला.

जखमी सिद्धीववर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु

घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी सिद्धीला रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

या घटनेमुळे भालवली गावात तणावपूर्ण वातावरण आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एसपीनींही गावात दाखल होत पीडित कुटुंबाची भेट घेतली.

जमिनीच्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. मात्र पोलीस तपासाअंतीच सर्व स्पष्ट होईल.